
‘रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याचे हिंदुस्थानने मान्य केले आहे. त्यानुसार हळूहळू ही खरेदी कमी होईल आणि चालू वर्षाअखेरपर्यंत पूर्णपणे थांबेल,’ असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केला. चीनलाही यासाठी तयार करू, असे ट्रम्प म्हणाले.
व्हाईट हाऊसमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी माझे कालच बोलणे झाले. हिंदुस्थान खरोखरच महान आहे. त्यांनी रशियाकडून तेल न घेण्याचा शब्द मला दिला आहे. अर्थात, अशा गोष्टी एकाएकी होत नाहीत. ती एक प्रक्रिया असते. या वर्षाअखेर ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प सरकारने हिंदुस्थानी मालावर 50 टक्के टॅरिफ लागू केला आहे. त्यातील 25 टक्के टॅरिफ हा रशियाशी तेलाचा व्यापार करत असल्याबद्दल दंड म्हणून लादण्यात आला आहे.
जिनपिंग मला समजून घेतील!
‘चीन आणि रशियाचे संबंध कधीच चांगले नव्हते. बायडेन आणि ओबामामुळे ते एकत्र आले. त्यांचे संबंध कधीच मैत्रीपूर्ण असू शकत नाहीत. ते केवळ तेल आणि वायुमुळे एकत्र आहेत. जिनपिंग यांच्या भेटीत मी त्यांच्याशी यावर बोलणारच आहे. मात्र, माझा भर युव्रेन–रशिया युद्ध थांबवण्यावर असेल. जिनपिंग माझे म्हणणे समजून घेतील, अशी आशा ट्रम्प यांनी व्यक्त केली.


























































