
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत मतचोरी आणि मतदारयादीतील घोटाळा यावर परखड मत व्यक्त केले आहे. मतचोरीचे पुरावे मागणाऱ्यांना 27 तारखेला याचे पुरावे मिळतील, त्यांनी ते बघावे आणि अनुभावावे, अशी शब्दांत संजय राऊत यांनी सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाला म्हटले आहे. तसेच सर्वपक्षीय मोर्चाबाबातही त्यांनी माहिती दिली.
मतचोरी, मतदारयादी घोटाळा याबाबत नवी दिल्लीत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सादरीकरण केले होते, आता मुंबईत अशाच प्रकारचे प्रेझेंटेशन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि त्यांची टीम करणार आहे. खूप महत्त्वाच्या गोष्टी त्यात संशोधन करून आणल्या आहेत. हे प्रेझेंटेशन देशाच्या आणि राज्याच्या निवडणूक आयोगाने काळाजीपूर्वक बघावे, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमडळाने मोठ्या पडद्यावर हे बघावे, आम्ही त्याची व्यवस्था करू. महाराष्ट्रात कशीप्रकारे मतचोरी, मतदारयाद्या घोटाळा करून निवडणुका जिंकण्यात आल्या, याचे प्रात्यक्षिक त्यांनी अनुभवावे. राज्यातील लोकशाही या लोकांनी कशी खतम केली, याची कदाचित त्यांना खात्री पटेल, लोकशाही आपण खतम केली आहे, निवडणुका आपण हायजॅक केल्या आहेत. ते पुरावे मागत आहेत, 27 तारखेला त्यांनी पुरावे प्रत्यक्ष बघावे. डुप्लिकेट मतदार, स्थलांतरीत मतदार, एकेका घरात 100 बिनबापाचे मतदार, हे काय प्रकार आहेत, ते सरकारने पाहावे, अनुभवावे. राज्यातील आणि देशातील निवडणूक आयोगाने, देशातील नागरिकांनी पाहावे, असे आवाहन त्यांनी केले.
मनसे, महाविकास आघाडी यांची मते या घोटाळ्याबाबत समान आहेत. या मुद्द्यावर सर्वपक्षीय लोकं काम करत आहेत. सर्वपक्षीय बैठका होत आहेत, सर्वपक्षीय शिष्टमंडळे या मुद्द्यावर निवडणूक आयोगाला भेटत आहेत आणि सर्वपक्षीय मोर्चा या मुद्द्यावर काढत आहेत. प्रत्येकजण आपापली भूमिका मांडत आहेत. राज ठाकरे यांनी पक्षातील यादी प्रमुखाचा मेळावा घेतला, त्यात त्यांनी याच मुद्द्यावर भर दिला आहे. राहुल गांधी सातत्याने या विषयावर बोलत आहे. त्यांनीच या विषयाला वाचा फोडली आहे. बिहारमध्ये तेजस्वी यादव यांनी राहुल गांधी यांच्यासोबत यात्रा काढत याबाबत जनतेला माहिती देत वातावरण तयार केले. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस याच विष्यवार निवडणूक आयोगाशी चर्चा करत आहे. पूर्ण देशात मतदार यादीतील घोटाळा हा गंभीर विषय आहे, असे ते म्हणाले.
मतदारयादीच शुद्ध आणि पवित्र नसेल, तर निवडणूक कशी पारदर्शक होऊ शकते. त्यामुळे 1 नोव्हेंबरचा मोर्चा हा सर्वपक्षीय मोर्चा आहे. आता जनता दिवाळीच्या हँगओव्हरमधून बाहेर पडेल आणि आम्ही आजपासून मोर्च्याचा तयारीला लागणार आहोत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यात या मोर्च्याबाबत सविस्तर चर्चा झाली. निवडणूक आयोग भाजपची शाखा म्हणून काम करत आहे, आता त्यांना दणका देणे गरजेचे आहे. त्यामुळे हा मोर्चा विराट असणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कर्नाटकात एक मत डिलीट करण्यासाठी 80 रुपये घेतात, एक मत डिलीट करण्यासाठी 80 रुपये घेतले जातात. अशाप्रकारे हजारो मतं कर्नाटकातील मतदार यादीतून वगळण्यात आली. महाराष्ट्रातही हाच फॉर्म्युला लावला जात आहे. जी एजन्सी कर्नाटकात मतदार यादी घोटाळ्याचे काम करत होती, तशा एकूण 6 एजन्सी मिंधे, भाजप यांनी महाराष्ट्रात लावल्या आहेत. त्यांना हवी असलेली नावं मतदारयादीत घुसडायची आणि आम्हांला मतं मिळतील त्या ठिकाणची नावे वगळायची, या कामासाठी भाजप, मिंधे यांनी कोट्यवधी रुपये खर्चून सहा-सात एजन्सी मुंबई आणि महाराष्ट्रात नेमल्या आहेत. त्या जोरावरच ते आमचाच महापौर होईल, असे सांगत आहे, असे ते म्हणाले.



























































