एटीएम कार्ड अदलाबदली करून फसवणूक करणारे गजाआड

एटीएम कार्डची अदलाबदली करून फसवणूक करणाऱ्या दोघांना विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. अब्दुल हकीब खान आणि दानिश अली अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.

विलेपार्ले येथे राहणारे तक्रारदार हे रिक्षाचालक आहेत. जून महिन्यात ते घरी होते. दैनंदिन खर्चासाठी त्यांना पैशांची गरज असल्याने ते विलेपार्ले येथील एका एटीएममध्ये गेले तेव्हा एटीएममध्ये एक जण उभा होता. तक्रारदार यांना उजव्या डोळय़ाने कमी दिसत असल्याने त्यांनी पैसे काढण्यासाठी एकाकडे मदत मागितली. त्यानंतर तक्रारदार यांनी त्याला एटीएम कार्ड आणि पासवर्ड दिला. त्याने पैसे काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पैसे निघत नव्हते.

दोन दिवसांनी तक्रारदार यांनी बँकेत जाऊन चौकशी केली तेव्हा ते कार्ड त्याचे नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. बँकेच्या अधिकाऱ्याने तपासणी केली असता त्याच्या खात्यातून दोन व्यवहार झाले असल्याचे लक्षात आले. त्या बँक व्यवहाराची माहिती तक्रारदार यांना दिली. कार्डची अदलाबदली करून बँक खात्यावर डल्ला मारल्याप्रकरणी त्याने विलेपार्ले पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. तपासादरम्यान पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली त्यावरून पोलिसांनी तपास करून अब्दुल आणि दानिशला ताब्यात घेऊन अटक केली. त्या दोघांना अटक करून आज न्यायालयात हजर केले होते.