सामना अग्रलेख – अ‍ॅनाकोंडा आला रे…!

दिल्लीचा अ‍ॅनाकोंडा आपल्या भक्ष्याभोवती आपल्या शरीराचे घट्ट वेटोळे करून त्याला गुदमरून मारतो व नंतर गिळतो. त्यामुळे मिंधे अ‍ॅनाकोंडाने सावध राहिले पाहिजे. मिंधे यांचा श्वास अलीकडे गुदमरलेला दिसतो. कारण त्यांच्याभोवती या अ‍ॅनाकोंडाचे घट्ट वेटोळे पडले आहे. अ‍ॅनाकोंडा हा फक्त अजस्र साप नसून तो एक राक्षस आहे. भाजपचा राक्षसगण असल्याने ते राणीच्या बागेत म्हणजे वीरमाता जिजाबाई उद्यानात अ‍ॅनाकोंडा आणत आहेत व सत्तेतल्या मंत्रिमंडळातले साप प्रदर्शनासाठी ठेवणार आहेत. ते पाहण्यासाठी तुडुंब गर्दी होईल, याविषयी आमच्या मनात शंका नाही.

सध्या मुंबईतील प्रख्यात राणीचा बाग म्हणजे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान फुल्ल झाले आहे. बागेतील विविध प्रकारचे प्राणी हा सगळय़ांच्याच आकर्षणाचा विषय नेहमीच बनला आहे. त्यात राज्यात जुलै 2016 साली भाजप-शिवसेनेचे सरकार असताना आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने ‘पेंग्विन’ पक्ष्यांचे आगमन बागेत झाले, पण ‘पेंग्विन’वर टीका करणाऱ्यांनी आता बागेत ‘अ‍ॅनाकोंडा’ नावाचा सापरूपी भव्य प्राणी आणायचे ठरवले आहे. सोमवारी मुंबईच्या डोम सभागृहात शिवसेनेचा मेळावा पार पडला व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अ‍ॅनाकोंडाचा संदर्भ गृहमंत्री अमित शहांशी जोडला. श्री. शहा हे योगायोगाने सोमवारी मुंबईतच होते. त्यांनी भाजपने बेकायदेशीरपणे गिळलेल्या भूखंडावर कुदळ मारली. तेथे भाजपचे दस तारांकित कार्यालय उभे राहात आहे. उद्धव ठाकरे यांचा जंगली प्राणी व तेथील वातावरणाचा अभ्यास पक्का आहे. ते हसत म्हणाले, ‘मुंबईत अ‍ॅनाकोंडाचे आगमन झाले आहे व त्याला मुंबई गिळायची आहे.’ उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अ‍ॅनाकोंडा हा प्रचंड मोठा साप आहे व तो सर्वकाही गिळंकृत करू शकतो. त्यामुळे भाजपास किंवा गृहमंत्र्यांना अ‍ॅनाकोंडाची दिलेली उपमा चपखल बसते. अ‍ॅनाकोंडा अजगरापेक्षा मोठा असतो व त्याच्या पोटात कितीही कोंबले तरी तो गिळत गिळत पुढे जातो. अ‍ॅनाकोंडाने नुकताच मुंबईच्या चौपाटीवर महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स महामंडळाचा मोक्याचा भूखंड असाच गिळला व तेथे आता टॉवर्स उभारण्याचे काम सुरू आहे. आता हा असा अ‍ॅनाकोंडा साप मुंबईत आणून जिजामाता उद्यानात ठेवला जाणार आहे. अ‍ॅनाकोंडा हा उष्णकटिबंधीय असलेल्या दक्षिण अमेरिकेत आढळणारा साप आहे. खास करून हा हिरव्या रंगाचा साप असतो. त्यामुळे सध्याच्या

नव हिंदुत्ववाद्यांना

तो परवडेल काय? अ‍ॅनाकोंडा सापाबरोबर बागेत इतर विविध प्रकारचे सर्प ठेवले जातील. घोणस, मण्यार, सरपटोळ, फुरसे, इंडियन कोब्रा, धामण वगैरे साप ठेवण्यापेक्षा सध्या मंत्रिमंडळात जे दोन पायांचे साप वावरत आहेत व गद्दारीचे विषारी फूत्कार सोडत आहेत, अशांना त्या अ‍ॅनाकोंडाबरोबर सर्पालयात ठेवायला हरकत नाही. महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ हे एक प्रकारे सर्पालयच आहे व या सर्पांचा बाप अ‍ॅनाकोंडा हा दिल्लीतून मुंबईत येत-जात असतो. त्यावेळी सर्व सरपटे अ‍ॅनाकोंडासमोर सरपटताना दिसतात. अ‍ॅनाकोंडा सोमवारी मुंबईत आला व म्हणाला, ‘मी सर्व विरोधी पक्ष गिळून टाकीन.’ हीच अ‍ॅनाकोंडाची लक्षणे आहेत. अ‍ॅनाकोंडाला भस्म्या आणि उचल्या रोग झाला की तो काहीही गिळू लागतो. अ‍ॅनाकोंडा सध्या विमानतळ, बंदरे, भारतीय क्रिकेट, देशाचे सार्वजनिक उपक्रम, धारावीचा प्रकल्प गिळून ढेकर देत आहेच, पण अ‍ॅनाकोंडाला आता संपूर्ण मुंबई गिळायची आहे व त्यासाठी आधी त्याला समस्त विरोधी पक्षाला फस्त करायचे आहे. त्यामुळे या अ‍ॅनाकोंडाचा उपचार करावा लागेल. अ‍ॅनाकोंडाने देशाची पार्लमेंट, सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग, सरकारेसुद्धा गिळली. मधल्या काळात अ‍ॅनाकोंडाने देशाच्या उपराष्ट्रपतींनाही गिळून पचवले आहे. त्यामुळे हा अ‍ॅनाकोंडा दुर्मिळ प्रजातीचा आहे. अ‍ॅनाकोंडाची मादी ही आकाराने जास्त मोठी असते व त्या मादीला दरवर्षी 50-60 पिल्ले होतात. हे आता खरेच मानायला हवे. कारण सध्याच्या मतदारयादीत अ‍ॅनाकोंडाच्या मादीने टाकलेली असंख्य पिल्ले जागोजाग दिसत आहेत.

एकेका बिळात

मादीने 50-60 पिल्ले जन्मास घालून त्यांची नावे मतदारयादीत आणली. हे कौशल्य अ‍ॅनाकोंडालाच जमू शकते. या अ‍ॅनाकोंडाची लांबी आणि भक्ष्य ग्रहण करण्याची शक्ती भयावह आहे. शक्यतो अ‍ॅनाकोंडा माणसे खात नाही, पण हा अ‍ॅनाकोंडा एकाच वेळी असंख्य खासदार, आमदार, राजकीय पक्षही गिळतो! त्यामुळे देशात भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. असा अ‍ॅनाकोंडा भाजपचे लोक वीरमाता जिजाबाई उद्यानात आणणार आहेत. दिल्लीच्या अ‍ॅनाकोंडाविषयी वक्तव्य केल्याबद्दल अ‍ॅनाकोंडाचे मोठे पिल्लू ‘मिंधे’ भयंकर चिडले. आपला फणा व शेपटी आपटू लागले. हा त्यांचा त्रागा समजण्यासारखा आहे. मिंधे ही अ‍ॅनाकोंडाची छोटी जात आहे व त्यांना फक्त पैशाने भरलेले ट्रक गिळण्याची सवय आहे. या अ‍ॅनाकोंडाच्या फण्याखाली दाढी आहे. हे नवे वैशिष्टय़ म्हणावे लागेल. हा मिंधे नावाचा अ‍ॅनाकोंडा पैशांच्या बॅगा, लाचारी, गद्दारी यावरच उपजीविका करतो. पण खरी गंमत म्हणजे, दिल्लीचा अ‍ॅनाकोंडा आपल्या भक्ष्याभोवती आपल्या शरीराचे घट्ट वेटोळे करून त्याला गुदमरून मारतो व नंतर गिळतो. त्यामुळे मिंधे अ‍ॅनाकोंडाने सावध राहिले पाहिजे. मिंधे यांचा श्वास अलीकडे गुदमरलेला दिसतो. कारण त्यांच्याभोवती या अ‍ॅनाकोंडाचे घट्ट वेटोळे पडले आहे. अ‍ॅनाकोंडा हा फक्त अजस्र साप नसून तो एक राक्षस आहे. भाजपचा राक्षसगण असल्याने ते राणीच्या बागेत म्हणजे वीरमाता जिजाबाई उद्यानात अ‍ॅनाकोंडा आणत आहेत व सत्तेतल्या मंत्रिमंडळातले साप प्रदर्शनासाठी ठेवणार आहेत. ते पाहण्यासाठी तुडुंब गर्दी होईल, याविषयी आमच्या मनात शंका नाही.