घरात बसून सिगारेट फुकणार्‍यांनी उद्धव ठाकरे यांच्या दौर्‍यावर बोलू नये, पालकमंत्री शिरसाट यांना दानवे यांचे सडेतोड उत्तर

मिंधे गटाचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्या दौर्‍याची खिल्ली उडवणारे वक्तव्य केले. या वक्तव्याचा खरपूस समाचार शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी आज घेतला. घरात बसून सिगारेट फुकणार्‍यांनी व रात्र ऐशोआरामात घालणार्‍या पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौर्‍यावर बोलू नये, असे सडतोड उत्तर दिले.

क्रांतीचौक येथील मातृभूमी प्रतिष्ठान येथील संपर्क कार्यालयात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौर्‍याबद्दल माहिती दिल्यानंतर पत्रकारांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्या दौर्‍याची खिल्ली उडवल्याबद्दल दानवे यांना विचारले असता दानवे म्हणाले की, घरात बसून सिगारेट फुकणार्‍यांनी उद्धव ठाकरे यांच्या दौर्‍याबद्दल बोलू नये, त्यांची लायकी नाही.

पावलोपावली मिंधेच्या मंत्र्यांचा अपमान

आगामी जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या निवडणुकीत सन्मानपूर्वक जागांचे वाटप झाले नाहीतर स्वबळावर निवडणूक लढवणार असे वक्तव्य मंत्री शंभूराजे देसाई यांनी केले. याबद्दल दानवे यांना विचारले असता ते म्हणाले, मिंधे गटाच्या मंत्र्यांना कोणत्याही विभागात विचारले जात नाही, त्यांचा पदोपदी अपमान केला जात आहे, आगामी निवडणुकीत भाजप जसे म्हणेल तसे त्यांना वागावेच लागेल, असा टोला त्यांनी लगावला.