
अमेरिकेत गुणवंतांची कमतरता आहे. त्यामुळेच परदेशातील कुशल मनुष्यबळाची गरज पडते, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मान्य केले. ट्रम्प यांच्या या व्यक्तव्याकडे परदेशी मनुष्यबळ तसेच शैक्षणिक व्हिसाबाबत बदललेली भूमिका म्हणून पाहण्यात येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत काहीशी नरमाईची भूमिका घेतली.
एच1-बी व्हिसांची संख्या कमी करणार का, याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की, अमेरिकन कामगारांच्या वेतनावर याचा परिणाम होतो. पण बाहेरून कुशल मनुष्यबळ आणावे लागणारच. काही काही क्षेत्रांत आपल्याकडे प्रतिभावान लोकांची कमतरता आहे. बेरोजगार लोकांना उचलून क्षेपणास्त्राच्या कारखान्यात नेऊ शकत नाही, असे ट्रम्प म्हणाले.
परदेश विद्यार्थ्यांबाबत यू टर्न; घेतली धास्ती
अमेरिकेने विद्यार्थी व्हिसासाठी मुलाखती घेण्याचे सहा महिन्यांपूर्वी थांबविले होते. याबाबत ट्रम्प यांनी यू टर्न घेतला आहे. ते म्हणाले की, चीन व इतर देशांमधून येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांची संख्या घटविल्यास अमेरिकेतील निम्मे कॉलेज बंद करण्याची वेळ येऊ शकते. त्या विद्यार्थ्यांना आपण रोख शकत नाही. ते विद्यापीठांची आर्थिक स्थिती सांभाळतात, असे ट्रम्प म्हणाले.





























































