जव्हारमध्ये लढणार आणि जिंकणारच! शिवसैनिकांचा निर्धार महाविकास आघाडी विजयी होणार

आरक्षण सोडत जाहीर होताच जव्हारमधील विविध राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नगर परिषदेची ही निवडणूक शिवसेना मोठ्या ताकदीने लढणार असून कोणत्याही परिस्थितीत जिंकणारच, असा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे. महाविकास आघाडी विजयी होणार असून जव्हारच्या विकासाला प्राधान्य देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले.

जव्हार नगर परिषद निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शांती सरोवर रिसॉर्टमध्ये आयोजित केलेल्या बैठकीत निवडणूक जिंकण्याचा निश्चय करण्यात आला. या बैठकीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पालघर जिल्हा संपर्कप्रमुख विलास पोतनीस, उपनेते व जिल्हा निरीक्षक अमोल कीर्तिकर यांनी मार्गदर्शन केले.

जव्हार नगर पारिषदेच्या निवडणुकीत शिंदे गट व भाजप हे आमने सामने येण्याची शक्यता आहे. तर अजित पवार गटाचा निर्णय अजूनही प्रतीक्षेत असतानाच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडी मजबुतीने ही निवडणूक ल ढवणार असल्याचे विलास पोतनीस व अमोल कीर्तिकर यांनी सांगितले. यावेळी लोकसभा संघटक जनार्दन म्हात्रे, जिल्हाप्रमुख अनुप पाटील, शिवसैनिक विश्वास वळवी उपस्थित होते. दरम्यान १७ नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून त्यानंतर जव्हारच्या राजकीय मैदानातील चित्र स्पष्ट होणार आहे.