स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार – अंबादास दानवे

राज्यातील नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहे. बहुतांश ठिकाणी आघाडी झाली असून काही ठिकाणी स्वबळावर लढविल्या जात असल्याची माहिती शिवसेना नेते तथा माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

क्रांतीचौक येथील मातृभूमी प्रतिष्ठान या संपर्क कार्यालयात अंबादास दानवे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहे. बहुतांश ठिकाणी आघाडी झाली आहे. काही ठिकाणी स्वबळावर लढत होत आहे. महाविकास आघाडी म्हणून लढताना ऐन निवडणूकीच्या तोंडावर उमेदवार ठरविणे, जागा वाटप करणे हे न करता दीड ते दोन महिने अगोदरच ही प्रक्रिया पार पाडली पाहिजे, असे मत दानवे यांनी व्यक्त केले.

स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. दोन निवडणूकीचा गॅप पडल्यामुळे कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा असते. इच्छूकांना मुरड घालणे अवघड जाते, त्यासाठी स्थानिक पातळीवर निर्णय घेणे गरजेचे असल्याचे दानवे म्हणाले.

विचाराच्या विरोधात एकत्र राहणार

स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही कोणा एका व्यक्तीच्या विरोधात लढवली जात नाही. महायुतीच्या विचाराच्या विरोधात धोरण ठरवून ही निवडणूक लढविण्यात येणार आहे. महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहणार असल्याचे दानवे यांनी सांगितले.

पार्थ पवारने रुपयाही न देता कंपनीच्या नावावर जमीन

पुणे येथील जमीन घोटाळ्यात अडकलेले पार्थ पवार यांनी रुपयाही न देता त्यांच्या कंपनीच्या नावावर १८०० कोटी रुपयांची सरकारी जमीन झाली. तरी देखील भाजपच्या मंत्र्यांकडून पार्थ पवारांना वाचविले जात आहे. अजित पवार यांचा राजीनामा घेण्याची धमक नाही. कोट्यावधी रुपयांचा भ्रष्ट्राचार झालेला असतानाही भाजपने उगाच साधन सुचितेच्या गप्पा मारू नये, असा टोला दानवे यांनी लगावला.