
बिहारमधील विधानसभा निवडणुकीनंतर लालूप्रसाद यादव यांच्या पक्षातील राष्ट्रीय जनता दलातील (RJD) परिस्थिती तणावाची आहे. निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर लालूप्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी यांनी राजकारण आणि कुटुंबाशी नातेसंबंध तोडत असल्याची घोषणा केल्यानंतर राजकारणातील वाद आता लालूप्रसाद यांच्या घरापर्यंत पोहचल्याचे दिसत आहे. रोहिणी यांच्या पोस्टनंतर बिहारचे राजकारण आणि लालूप्रसाद यांच्या घरातील यादवीवर चर्चा होत आहे.
रोहिणी यांच्या पोस्टनंतर आता लालूप्रसाद यांचे मोठे पुत्र तेजप्रताप यादव यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यांना आपल्या बहिणीचा रोहिणीचा झालेला अपमान सहन झालेला नाही, या अपमानाबाबत त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच रोहिणी आचार्य यांच्याशी संबंधित वादावर मोठे विधान केले आहे. या पोस्टमुळे लालू कुटुंबातील गोंधळ आणखी वाढला आहे.
तेज प्रताप यांनी त्यांच्या पक्षाच्या इन्स्टाग्राम हँडलवर म्हटले आहे की, कालच्या घटनेने मला मनापासून हादरवून सोडले आहे. माझ्यासोबत जे घडले ते मी सहन केले… पण माझ्या बहिणीवर झालेला अपमान कोणत्याही परिस्थितीत असह्य आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच तेजप्रताप यांनी तेजस्वी यादव यांच्या सल्लागारांवर (संजय यादव, रमीज) नाव न घेता हल्ला चढवला आहे. त्यांनी म्हटले आहे की, जयचंद, जर तुम्ही कुटुंबावर हल्ला केला तर बिहारचे लोक तुम्हाला कधीही माफ करणार नाहीत. माझी बहीण रोहिणीवर चप्पल उगारल्याची बातमी ऐकल्यापासून मला वेदना झाल्या आहेत. जेव्हा सार्वजनिक भावना दुखावल्या जातात तेव्हा त्याचे परिणाम भोगावे लागतात. या काही चेहऱ्यांनी तेजस्वीच्या बुद्धीवरही परिणाम केला असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
त्यांनी इशारा दिला की, या अन्यायाचे परिणाम भयानक होतील. तेज प्रताप यांनी त्यांचे वडील लालूप्रसाद यादव यांच्याकडून तात्काळ हस्तक्षेपाची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, बाबा, मला एक इशारा द्या… तुम्ही फक्त एक होकार द्या, आणि बिहारचे लोक या जयचंदांना स्वतःच पुरतील. त्यांनी सांगितले की ही लढाई कोणत्याही पक्षाबद्दल नाही, तर कुटुंबाच्या सन्मानाबद्दल, मुलीच्या प्रतिष्ठेबद्दल आणि बिहारच्या स्वाभिमानाबद्दल आहे. तेजप्रताप यांच्या या पोस्टचीही राजकारणात चर्चा होत आहे.

























































