‘ऑपरेशन सिंदूर’मुळे आपले 18 लोक मेले, बाकी काही निष्पन्न झाले नाही! फारुक अब्दुल्ला यांनी सुनावले

‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये आपले 18 लोक मेले. त्या पलीकडे त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे अशा प्रकारची कारवाई भविष्यात व्हायला नको, अशी अपेक्षा नॅशनल काॅन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांनी आज व्यक्त केली.

दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. ‘‘भविष्यात ‘ऑपरेशन सिंदूर’सारखी कारवाई होऊ नये. त्यातून काही निष्पन्न होत नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये आपले 18 लोक मारले गेले. सीमेवर मोठे आर्थिक नुकसान झाले. हिंदुस्थान व पाकिस्तान या दोन्ही देशांनी आपले संबंध अधिक चांगले कसे होतील हे पाहावे. तोच एक मार्ग आहे,’’ असे अब्दुल्ला म्हणाले. ‘‘आपण मित्र बदलू शकतो, शेजारी बदलणे आपल्या हातात नाही,’’ या अटलबिहारी वाजपेयींच्या वाक्याची आठवणही त्यांनी दिली.

नौगाममधील स्फोट ही आपली चूक

श्रीनगरच्या नौगाम येथील पोलीस ठाण्यात झालेल्या स्फोटावरही त्यांनी भाष्य केले. ‘‘ज्या पद्धतीने स्थानिक अधिकारी ही स्फोटके हाताळत होते, ती आपली चूक होती. ते करण्याआधी स्फोटकांविषयीची योग्य माहिती असलेल्या तज्ञांशी चर्चा करायला हवी होती. ते न केल्याचा हा परिणाम दिसतो आहे,’’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली.