
मुंबईत कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. कांदिवलीतील चारकोप एका बांधकाम व्यवसायिकावर दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिलीमा भाई आपल्या कारमध्ये बसलेला असताना दोन अज्ञात तरुणांनी त्याच्यावर दोन ते तीन गोळ्या झाडल्या. यापैकी दोन गोळ्या त्याच्या पोटात लागल्या, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे, गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. जखमी दिलीमा भाईला तात्काळ बोरिवलीतील ऑस्कर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. चारकोप पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरु केली असून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. फॉरेन्सिक तज्ज्ञांनीही घटनास्थळाची तपासणी करून पुरावे गोळा केले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.




























































