
म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या मेळाव्यात पालिकेतील कर्मचारी, कामगारांचे प्रलंबित असणारे सर्व प्रश्न एकजुटीने सोडवण्याचा निर्धार केला. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या कार्यकारी सदस्यांचा हा मेळावा माटुंगा येथे अध्यक्ष बाबा कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
मुंबई महानगरपालिकेतील सर्व रिक्त शेड्युल्ड पदे भरणे, सर्व कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत कालबद्ध पदोन्नतीचा लाभ मिळणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे देय दावे तातडीने निकाली काढणे, डी.सी-1 चे दावे निकाली काढणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करणे, ए.एन.एम.चा निपटारा जलदगतीने करणे, सहावा वेतन आयोग लागू करताना झालेल्या वेतन विसंगती दूर करणे, गृहकर्ज मर्यादा 10 लाखांवरून 50 लाख करणे, 5 मे 2008 पूर्वी भरती प्रक्रिया सुरू झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणे, गटविमा योजना लागू करताना युनियनने केलेल्या सूचना विचारात घ्याव्या, अन्यथा गटविमा योजनेऐवजी पालिका कर्मचाऱ्यांना रेल्वे, बीपीटीच्या धर्तीवर स्वतंत्र सुसज्ज रुग्णालय उपलब्ध करून मिळावे. या मागण्यांसाठी युनियनच्या वतीने केलेल्या पाठपुराव्याची माहिती उपाध्यक्ष संजय कांबळे-बापेरकर यांनी दिली. यावेळी उपाध्यक्षा अॅड. रंजना नेवाळकर, सरिचटणीस रचना अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले.
पालिकेचा मनमानी कारभार
पालिकेत सध्या महापौर किंवा नगरसेवक नसल्याने कामगारांचे प्रश्न सोडविण्यास अनेक अडचणी निर्माण होत आहे. पालिका अधिकारी कामगारांचे प्रश्नांकडे कानाडोळा करीत असून प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू असल्याचे अध्यक्ष बाबा कदम म्हणाले.


























































