पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवासी सुरक्षेसाठी सुविधा वाढवा

पश्चिम रेल्वेच्या अनेक स्थानकांत विविध सुविधांची कमतरता आहे. त्यामुळे नियमित प्रवाशांची गैरसोय होत आहे, याकडे महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाने रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले आणि प्रवासी सुरक्षेसाठी रेल्वे स्थानकांच्या परिसरात सुविधा वाढवण्याची मागणी केली. विविध रेल्वे स्थानकांचे स्टेशन मॅनेजर आणि लोहमार्ग पोलीस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत प्रवासी सुरक्षेबाबत चर्चा करण्यात आली.

पश्चिम रेल्वे मार्गावर अलीकडेच एका गर्भवती महिलेला वैद्यकीय सुविधेअभावी त्रास सहन करावा लागला. राम मंदिर स्थानकाच्या आवारात रुग्णवाहिका नसल्यामुळे महिलेची स्थानकातच प्रसूती झाली. त्या घटनेनंतर पश्चिम रेल्वे मार्गावरील सुविधांच्या कमतरतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाने अत्यावश्यक जीवनरक्षक मेडिकल सुविधा, प्रथमोपचार औषधे, स्ट्रेचर, व्हीलचेअर, रुग्णवाहिकांची उपलब्धता, पिण्याचे पाणी, शौचालये, सरकते जिने, सीसीटीव्ही आदी मुद्दय़ांबाबत प्रशासनाशी चर्चा केली. यावेळी महासंघाचे अध्यक्ष अभिजीत धुरत, महासंघाचे पश्चिम रेल्वे उपाध्यक्ष राजेश पंड्या आदी पदाधिकारी उपस्थित होते.