
दिल्लीत एका खासगी शाळेत दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने धावत्या मेट्रोसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शौर्य प्रदीप पाटील असे त्या विद्यार्थ्याचे नाव असून तो मूळचा सांगलीचा होता. शौर्यने आत्महत्येपूर्वी एक सुसाईट नोट लिहली असून शाळेतील शिक्षकांकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यातून केला आहे. या प्रकरणी मुलाच्या वडिलांनी करोल बाग पोलीस ठाण्यात शिक्षक व शाळेविरोधात तक्रार दाखल केली आहे.
शौर्य प्रदीप पाटील हा मूळचा सांगलीतील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वरचा रहिवासी आहे. त्याचे वडील हे गेल्या काही वर्षांपासून दिल्लीत स्थायिक आहेत. ते दिल्लीतील राजीव नगर भागात राहता. तर शौर्य हा सेंट कोलंबस शाळेच्या दहावीच्या वर्गात शिकत होता. शौर्यने आत्महत्येपूर्वी एक सुसाईट नोट लिहली असून त्यात त्याने शिक्षकांवर गंभीर आरोप केले आहेत.
”माझं नाव शौर्य पाटील आहे. मी देत असलेल्या नंबर वर कॉल करून माझ्या आई वडिलांना कळवा. मी हे जे काही करतोय त्यासाठी मला माफ करा. पण शाळेतल्या शिक्षकांमुळे मला हे करावे लागत आहे. ज्यांना गरज आहे त्यांना माझे अवयव दान करा. माझ्या कुटुंबियांनी माझ्यासाठी खूप काही केले आहे. सॉरी मम्मी पप्पा मी तुम्हाला काही देऊ शकलो नाही. सॉरी दादा. सॉरी मम्मी मी तुला खुपदा दुखावलं आहे, आज शेवटचं दुखावतोय”, असे शौर्यने या नोटमध्ये लिहले आहे.
या प्रकरणी प्रदीप पाटील यांनी शाळेच्या मुख्यध्यापिका अपराजिता पाल आणि मनू कालरा, युक्ती महाजन आणि ज्युली व्हर्गिस या शिक्षिकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.



























































