मारकुट्या शिक्षकाच्या दहशतीला घाबरून विद्यार्थी जंगलात लपून बसले, जव्हारच्या शाळेतील धक्कादायक घटना

जव्हार तालुक्यातील जांभूळमाथा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाने विद्यार्थ्यांवर निर्माण केलेल्या दहशतीमुळे विद्यार्थी शाळेत जाण्याऐवजी जंगलात लपून बसू लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांच्या छळाची ही कर्म कहाणी कळताच पालकांच्या संतापाचा स्फोट झाला. त्यांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडक देत या शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली

14 नोव्हेंबर रोजी शिक्षक लोकनाथ जाधव यांनी विवेक बिपिन भोरे, साईनाथ मोरघा, स्वप्निल मोरघा, चेतन अनेक, प्रमोद जंगली या विद्यार्थ्यांना 1 किलोमीटर लांब असलेल्या झऱ्यावर पाणी भरायला पाठवले, दूर अंतर असल्याने या विद्यार्थ्यांना पाणी आणण्यात उशीर झाला. इतका उशीर का झाला असा आरडाओरडा करत या शिक्षकाने विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली. हे चित्र पाहताच उर्वरित विद्यार्थी आपला जीव वाचवत बचाव करण्यासाठी जंगलात लपून बसले. ही बाब पंचायत समितीच्या प्रशासकीय विभागाला कळूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.

विद्यार्थ्यांना शिक्षा म्हणून शाळेच्या अंगणात उभे करणे. कानाखाली मारणे. शिकवण्याऐवजी मोबाईलमध्ये रमणे, वारंवार उशिरा शाळेत येणे, शनिवारी सरळ गैरहजेरी… या सर्व प्रकारांनी पालक संतापले आहेत. यामुळे येथील विद्यार्थ्यांना हक्काच्या शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ उद्भवली आहे.

शाळेत पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग असून येथील पट संख्या 96 आहे. शाळेची नियमित वेळ ही 10.30 ची आहे पण शिक्षक महोदय 11.30 ला हजेरी लावतात, असा पालकांचा आरोप होत असून निवेदनात तसे नमूद करण्यात आले आहे. अशी परिस्थिती असताना देखील गावकऱ्यांमध्ये एकाच प्रश्नाची चर्चा आहे की, “या शिक्षकाच्या पाठीशी कोण? एवढा उर्मटपणा कोणामुळे?” यांना वरदहस्त कुणाचा असे नाना प्रश्न गावकऱ्यांना पडत आहेत. अखेर या तक्रारींची दखल घेत ढाढरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुभाष भोरे यांनी स्वतः पुढाकार घेतला. ग्रामपंचायत कमिटी, पालक आणि विद्यार्थ्यांची संयुक्त बैठक घेत भोरे यांनी शिक्षण विभागाला थेट सवाल करत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

जांभूळ माथा शाळेतील शिक्षकाच्या वर्तुणुकीबाबत समजले आहे. संबंधित विभागाला या प्रकरणाची शहानिशा करून उचित कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
– मनोज रानडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर