
चारित्र्याच्या संशयातून मध्यरात्री डोक्यात दगड घालून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना मालाडमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. सिराज नाईक असे आरोपी पतीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
सिराज नाईक पत्नी मुमताजसह मालाडमधील मालवणी परिसरात राहत होता. सिराजला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. यामुळे दोघांमध्ये सतत भांडण होत होते. बुधवारी रात्री उशिरा पती-पत्नीमध्ये पुन्हा वाद झाला. यानंतर पत्नी झोपी गेली. मात्र या वादाचा राग मनात धरून पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. यानंतर गुरुवारी सकाळी पती मालवणी पोलीस ठाण्यात गेला आणि हत्येची कबुली दिली.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत जखमी मुमताजला रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यानंतर पोलिसांनी पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.


























































