
शाळेच्या इमारतीवरून उडी घेत आठवीच्या विद्यार्थिनीने जीवन संपवल्याची घटना जालना घडली आहे. शहरातील सीटीएमके गुजराती विद्यालयात शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. विद्यार्थिनीने हे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अद्याप समजू शकले नाही. पुढील तपास सुरू आहे.
नेहमीप्रमाणे ही मुलगी सकाळी सात वाजता शाळेत गेली. प्रार्थना झाल्यानंतर सर्व विद्यार्थी वर्गात गेले. मयत मुलगीही वर्गात गेली. त्यानंतर तिने अचानक शाळेच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. यावेळी खाली मैदानात असलेल्या शिक्षकांनी तिला तात्काळ रुग्णालयात नेले.
पोलिसांनी या घटनेची पुष्टी केली आहे. रुग्णालयातून एमएलसी प्राप्त झाली आहे, असे पोलिसांनी सांगितले. मुलगी सात वाजता शाळेत गेली. त्यानंतर 7.30 ला शाळेतून मुलीने इमारतीवरून उडी घेतल्याचा फोन आल्याचे मयत विद्यार्थिनीच्या वडिलांनी सांगितले. आपण शाळेत पोहचेपर्यंत मुलीला रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथून तिला सिव्हिल रुग्णालयात रेफर करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले, असे तिच्या वडिलांनी पुढे सांगितले.


























































