
बिहारच्या नवीन एनडीए सरकारचे खातेवाटप जाहीर झाले आहे. या खातेवाटपातून बिहार सरकारच्या नाड्या भाजपच्या हाती असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचे कारण म्हणजे २० वर्षांनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गृहखाते सोडले आहे. हे खाते आता भाजपकडे गेले आहे. उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी गृहखात्याची जबाबदारी सांभाळणार आहे. गुरुवारी नितीश मंत्रिमंडळात एकूण २६ मंत्र्यांनी शपथ घेतली, परंतु सध्या फक्त १८ मंत्र्यांनाच खाती वाटप करण्यात आली आहेत.
भाजपने जेडीयूला वित्त विभाग दिला आहे. बिजेंद्र यादव ऊर्जा विभागासोबत वित्त विभागाची देखरेख करतील. मंगल पांडे यांना आरोग्य विभागाचीही जबाबदारी देण्यात आली आहे. पहिल्यांदाच मंत्री झालेल्या श्रेयसी सिंग यांना क्रीडा खाते देण्यात आले आहे. एचएएमचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष सुमन यांचे खाते कायम राहिले आहे. ते पुन्हा लघु जलसंपदा मंत्री असतील.
उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांना जमीन आणि महसूल खाते तसेच खाण आणि भूगर्भशास्त्र खाते देण्यात आले आहे. मात्र कृषी खाते त्यांच्याकडून काढून भाजप कोट्यातील मंत्री रामकृपाल यादव यांना देण्यात आले आहे. दिलीप जयस्वाल यांना उद्योग मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. नितीन नवीन यांना कागदपत्रे विभागासह नगरविकास आणि गृहनिर्माण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.




























































