लोकलमधील लॅपटॉप चोराला नेरळमध्ये बेड्या

लोकलमधील रॅकवर ठेवलेली लॅपटॉपची बॅग चोरणाऱ्या चोरट्याच्या कर्जत लोहमार्ग पोलिसांनी 24 तासांत मुसक्या आवळल्या. रिजवान कलानिया असे अटक आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला नेरळमधून उचलले. त्याच्या ताब्यातून लॅपटॉपची बॅग हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

चाळीसगाव येथे राहणाऱ्या पंकज राठोड याने कल्याणहून खोपोली लोकल पकडली. तो दिव्यांग डब्ब्यातून प्रवास करत होता. त्याने आपली लॅपटॉपची बॅग रॅकवर ठेवली. मात्र ही लोकल नेरळ स्थानक येताच त्याला रॅकवर बॅग दिसली नाही. आपली बॅग चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्याने कर्जत लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याची गंभीर दखल घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने स्थानकातील सीसीटीव्ही तपासले. आरोपी नेरळमध्ये लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून रिजवानला अटक केली.