
>> नवनाथ शिंदे
नागरिकांच्या सुरक्षिततेचा गाजावाजा करणाऱ्या पुणे पोलिसांवर दुचाकीस्वार चोरटे, घरफोडी करणारे, कोयता गँग सातत्याने वरचढ ठरत आहे. डेक्कनमध्ये कोयताधार टोळक्याने पोलिसांच्या नाकावर टिच्चून दरोडा टाकला आहे. बाजीराव रस्त्यावरील कोयताधारी टोळक्याने अल्पवयीन मुलावर सपासप वार करून संपवले होते. तसेच खुनातील आरोपीच्या भावावर कोयत्याने हल्ला चढवून बदला घेतल्याचीही घटना ताजी आहे. अशा घटनांमुळे पुणे खरंच सुरक्षित राहिले आहे का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
‘कोयता गँग’ पुन्हा एकदा अॅक्टिव्ह झाल्याचे दिसून येत आहे. येरवडा, गोखलेनगर परिसरातील वडारवाडीत टोळक्याने कोयत्याच्या धाकाने वाहनांची तोडफोड केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारून टोळीला अटकही केली. त्यामुळे कोयताधाऱ्यांमध्ये थोडीशी भीती निर्माण झाली होती. मात्र, मध्यवर्ती डेक्कन परिसरातील बारवर कोयताधारी टोळक्याने दरोडा टाकून डोके वर काढले आहे. एकीकडे दुचाकीस्वार चोरट्यांचा धुडगूस कायम आहे. तर वाहनचोरीसह इतर सुरक्षिततेचे तीनतेरा झाले आहेत.
पीएमपीएल बसमध्ये प्रवाशांच्या ऐवजावर डल्ला मारणाऱ्या टोळ्या आणि सायबर चोरट्यांनी पुणेकरांना अक्षरशः वेठीस धरले आहे. सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून पुणेकरांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे.
बहुतांश पोलिसांचे ग्राऊंडवर उतरून पोलिसिंगचे प्रमाण कमी झाल्यामुळे लुटमार, चोऱ्या, चेन स्नॅचिंगचा आलेख उंचावला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहेत. त्यातच अल्पवयीन कोयताधारी टोळक्याच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. कधी घोळका धावत कोणाचा पाठलाग करून कोयत्याने सपासप वार करेल, याचा नेम राहिला नाही. राग, खुन्नस, पूर्ववैमनस्यातून थेट कोयता आणि घातक शस्त्रांद्वारे केली जाणारी मारहाण गँगवार भडकले असून, दिवसाढवळ्या गोळीबार, कोयत्याच्या वाराने सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
गुंड गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर, वनराजच्या हत्येतील आरोपीचा भाऊ गणेश काळे तसेच मयंक खरारे या अल्पवयीनाचा अत्यंत वर्दळीच्या बाजीराव रस्त्यावर कोयत्याने हल्ला करीत खून केला. घातक कोयत्यांच्या विक्रीला बंदी असतानाही बिनदिक्कतपणे विकले जाणारे कोयते, अल्पवयीनांमध्ये सुरू असलेल्या भाईगिरीची क्रेझ थेट खुनापर्यंत येऊन पोहोचली आहे. त्यामुळे पुण्यातील गुन्हेगारीबद्दल खडान्खडा माहिती असणारे अधिकारी सक्रिय असूनही उपयोग काय? असा प्रश्न निर्माण केला जात आहे. पोलीस दलातील शिथिलतेमुळेच गुन्हेगारांचे धाडस वाढले आहे का? पोलीस यंत्रणा बोथट झाल्याने कोयत्याचा वापर गुन्हेगारीसाठी होऊ लागला का? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. कोयताधारींच्या धुडगुसामुळे पुणे पोलिसांच्या कामगिरीला लागणारा बट्टा पुसून काढण्यासाठी ठोस अंमलबजावणीची आवश्यकता आहे. त्यासाठी शस्त्रधारीविरुद्ध ऑन दी स्पॉट फैसला अशीच तयारीही पोलिसांना करावी लागणार आहे.
पोलिसांचा वचक कमी करणारी असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, कुख्यात गुंड बंडू आंदेकर याचा मुलगा वनराजच्या खुनानंतर पुण्यात कोयताधारींचा असाही ट्रेंड सोशल मीडियावर शस्त्रास्त्रांद्वारे ताकद दाखवण्यासाठीही कोयताधारींचा ट्रेंड निर्माण होत आहे. प्रामुख्याने अल्पवयीन मुलांसह नुकतीच मिसरूड फुटलेली पोरंही आता अशा ट्रेंडकडे झुकत आहेत. पालकांचे दुर्लक्ष, प्रलोभन, आकर्षणापोटी अनेकजण गुन्हेगारीकडे वळत आहेत. त्यावर उपाय शोधून वेळीच आवर घालणे काळची गरज आहे. अन्यथा सोशल मीडियाच्या जमान्यात व्हायरलप्रमाणे गुन्हेगारीलाही धार चढण्यास वेळ लागणार नाही.
























































