
पिंपरी-चिंचवडसह राज्यातील अनेक महानगरपालिकांच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे आरोप केले.
दानवे म्हणाले की, भौगोलिक रचनानुसार याद्या करण्याऐवजी अनेक प्रभागांमध्ये बाहेरील लोकांना समाविष्ट करण्यात आले आणि स्थानिक मतदार याद्यांमधून बाहेर फेकण्यात आले. याबाबत राज्यभरातून तक्रारी प्राप्त होत असून हा प्रश्न केवळ एका भागाचा नसून प्रत्येक ठिकाणचा आहे.
त्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे प्रारूप याद्यांवर हरकत नोंदविण्यासाठी 21 दिवसांची मुदत देण्याची मागणी केली.
दानवे म्हणाले, की “लोक मतदानाच्या दिवशी लक्ष देतात; त्यामुळे हरकतींसाठी पुरेसा वेळ देणे गरजेचे आहे.”
दानवे यांनी सांगितले की, नगरपालिकांमध्ये फोडाफोडीचा खेळ सुरू असून, संभाजीनगरातील फुलंब्री नगरपालिका आणि जळगावच्या जामनेर येथील घटनांचा उल्लेख करत खरे लोकशाही मूल्य बाजूला ठेवून सत्ता मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप केला.
तसेच बिहार आणि गुजरातमधील मतदार मुंबईत येतात, पण मराठी माणूस मतदानात उदासीन असतो. मराठी मतदारांनी जागृत होऊन मतदान करावे आणि मराठी भूमिकेला पाठिंबा द्यावा. 50% आरक्षणाबाबत कोर्टाकडून आदेश येताच निवडणूक आयोगाला एका दिवसात नव्या आरक्षणाची रचना करता येऊ शकते, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.



























































