
आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026 चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. हिंदुस्थान आणि श्रीलंकेत 7 फेब्रुवारी ते 8 मार्खेच 2026 दरम्यान खेळवल्या जाणाऱ्या वर्ल्डकपमध्ये एकूण 20 संघ विजेतेपदासाठी झुंजताना दिसतील. या चार संघाची चार वेगवेगळ्या ग्रुपमध्ये विभागणी करण्यात आली आहे. एकूण 55 सामने खेळले जाणार आहेत. 7 फेब्रुवारी रोजी पहिला सामना पाकिस्तान आणि नेदरलँडमध्ये सकाळी 11 वाजता कोलंबो येथे, दुसरा सामना वेस्ट इंडिज आणि बांगलादेश संघात दुपारी 3 वाजता कोलकाता येथे आणि तिसरा सामना हिंदुस्थान आणि युएईमध्ये सायंकाळी 7 वाजता मुंबई येथे रंगणार आहे.
हिंदुस्थानचा संघ तब्बल 10 वर्षानंतर घरच्या मैदानावर टी20 वर्ल्डकप खेळणार आहे. याआधी 2016 मध्ये हिंदुस्थानमध्ये वर्ल्डकप झाला होता. यंदाच्या वर्ल्डकपचे वैशिष्ट्य म्हणजे रोहित शर्माशिवाय होणारा हा पहिला टी20 वर्ल्डकप आहे. याआधी झालेले सर्व वर्ल्डकप रोहित शर्मा खेळला आहे. अर्थात खेळाडू म्हणून तो मैदानात नसला तरी यंदाच्या आगामी वर्ल्डकपचा तो ब्रँड ॲम्बेसेडर असणार आहे.
8 ठिकाणी रंगणार सामने
टी20 वर्ल्डकपचे सामने 8 मैदानावर रंगणार आहेत. हिंदुस्थानात 5 ठिकाणी, तर श्रीलंकेत 3 ठिकाणी सामने होतील. हिंदुस्थानात दिल्ली, अहमदाबाद, कोलकाता, चेन्नई, मुंबई, तर श्रीलंकेत कोलंबो (एसएससी आणि प्रेमदासा), कँडी येथे वर्ल्डकपचे सामने खेळले जातील.
हिंदुस्थान-पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये
ग्रुप A – हिंदुस्थान, पाकिस्तान, यूएस, नेदरलँड, नामिबिया
ग्रुप B – ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आयर्लंड, झिंबाब्वे, ओमान
ग्रुप C – इंग्लंड, वेस्ट इंडीज, बांगलादेश, नेपाळ, इटली
ग्रुप D – न्यूझीलंड, साऊथ आफ्रिका, अफगाणिस्तान, कॅनडा आणि यूएई
हिंदुस्थानचा पहिला सामना मुंबईत
हिंदुस्थानचा संघ आपला शुभारंभाचा सामना 7 फेब्रुवारी रोजी मुंबईत युएई सोबत खेळणार आहे. त्यानंतर दुसरा सामना दिल्लीत 12 फेब्रुवारी रोजी नामिबिया, तिसरा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत 15 फेब्रुवारीला कोलंबो येथे आणि चौथा सामना 18 फेब्रुवारी रोजी नेदरलँड विरुद्ध अहमदाबाद येथे खेळेल.
मुंबईत रंगणार 8 सामने
7 फेब्रुवारी रोजी हिंदुस्थान विरूद्ध अमेरिका, सायंकाळी 7 वाजता
8 फेब्रुवारी रोजी इंग्लंड विरूद्ध नेपाळ, दुपारी 3 वाजता
11 फेब्रुवारी रोजी इंग्लंड विरूद्ध वेस्ट इंडिज, सायंकाळी 7 वाजता
12 फेब्रुवारी रोजी नेपाळ विरूद्ध इटली, दुपारी 3 वाजता
15 फ्रेबुवारी रोजी वेस्ट इंडिज विरूद्ध नेपाळ, सकाळी 11 वाजता
17 फेब्रुवारी रोजी बांगलादेश विरूद्ध नेपाळ, सायंकाळी 7 वाजता
23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी वाजता सुपर 8 फेरी
5 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजता सेमीफायनल लढत




























































