
तुम्हाला नवरासुद्धा शंभर रुपये देत नाही. देवाभाऊंनी लाडकी बहीण योजना आणली, पंधराशे रुपये तुम्हाला दिलेत. या पंधराशे रुपयांची इमानदारी ठेवा. देवाभाऊ नसले तर तुमच्या खात्यातील पैसे बंद होतील, असे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी लाडक्या बहिणींना बजावले.
कुर्डुवाडीतील प्रचार सभेत जयकुमार गोरे लाडक्या बहिणींना उद्देशून म्हणाले, ‘येत्या 2 तारखेला मतदान आहे. पैसा कुणाचा पण घ्या. काही फरक पडत नाही. सगळय़ांचे पैसे घ्या, पण मत त्यांना देऊ नका. मतदानाला जाताना देवाभाऊचे पंधराशे रुपये विसरू नका. इमानदारी ठेवा. तुम्हाला नवरासुद्धा 100 रुपये देत नाही. सख्खा भाऊसुद्धा राखी पौर्णिमेला 100 रुपये टाकताना त्याच्या बायकोकडे पाहतो. तिने मान हलवली तरच तो ताटात टाकतो आणि नाही म्हटले की तो परत नोट खिशात घालतो,’ असे गोरे म्हणाले.
– इथे येऊन कोण म्हणतं तिजोरी आमच्याकडे आहे, तर कोण म्हणतं चावी आमच्याकडे आहे, पण बँकच आमच्याकडे आहे. मग तिजोरी आणि चावी कुठून आणणार, असा टोला गोरे यांनी लगावला. मुख्यमंत्री म्हणजे सरकार असते आणि मंत्रिमंडळ ही व्यवस्था असते. राज्यातील प्रत्येक प्रोजेक्ट हा मुख्यमंत्र्यांच्या सहीने मंजूर होत असतो. कदाचित हे लोक विसरतात, असा टोला गोरे यांनी लगावला.

































































