सागरी सुरक्षारक्षकांच्या घराला आर्थिक भगदाड, चार महिन्यांपासून पगाराची फुटकी कवडी नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सागरी सुरक्षेला भगदाड पडू नये म्हणून डोळ्यात तेल घालून पहारा देणाऱ्या रक्षकांच्या घरालाच आर्थिक भगदाड पडले आहे. गेल्या चार महिन्यांपासून त्यांना पगाराची फुटकी कवडी न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. विविध योजनांवर सरकार कोट्यवधी रुपये खर्च करीत असताना सागराचे रक्षण करणाऱ्या सुरक्षारक्षकांना मात्र वाऱ्यावर सोडले आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, मुलांची फी, आईवडिलांच्या औषधांचा खर्च कुठून भागवायचा, या चिंतेने सुरक्षारक्षकांना ग्रासले आहे.

मुंबई येथील झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर रायगडातील सागरी सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला होता. त्यामुळे मत्स्यव्यवसाय विभागामार्फत रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाच्या माध्यमातून सुरक्षारक्षकांची नेमणूक केली. निधी उपलब्ध नसल्याने या सुरक्षारक्षकांची चांगलीच गैरसोय झाली. चार महिने पगार न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उसने पैसे घेऊन किंवा दागिने गहाण ठेवून घर चालवण्याची वेळ आली आहे. सरकारने आता तरी जागे व्हावे आणि लवकरात लवकर वेतन खात्यात जमा करावे अशी विनंती सुरक्षारक्षकांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

सुरक्षारक्षकांना स्टेशनरी खर्च मिळत नसल्याने त्यांना अन्य खर्चाचाही भुर्दंड सहन करावा लागत आहे. रिपोर्टसाठी स्वखर्चाने स्टेशनरी विकत घ्यावी लागते. स्टेशनरीचे पैसे मिळावेत यासाठी वारंवार मागणी करूनही मत्स्यव्यवसाय विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. पर्यवेक्षकांना बंदरांवर गस्त घालण्यासाठी इंधन खर्च मिळत नाही. त्यात परस्पर बदल्या करणे, ऑफिस कामाव्यतिरिक्त इतर कामे देणे यामुळे डोक्याचा ताप आणखी वाढल्याचे सुरक्षारक्षकांनी सांगितले.

१९९३ च्या काळ्याकुट्ट आठवणी

१९९३ मध्ये मुंबईमध्ये घडवण्यात आलेल्या साखळी बॉम्बस्फोटात वापरलेली स्फोटके रायगडच्या शेखाडी समुद्रकिनाऱ्यावर उतरवल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर २६ नोव्हेंबर २००८ मध्ये झालेला दहशतवादी हल्ल्यावेळीही समुद्री मार्गानेच घुसखोरी करण्यात आली होती. या हल्ल्यानंतर सागरी सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता, पण जे या सागराची सुरक्षा करतात त्यांनाच पगार मिळत नसेल तर सरकार किती गंभीर आहे याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

रायगडातील २० बंदरे अतिसंवेदनशील

समुद्रीमार्गाने अतिरेकी हल्ला होण्याची भीती असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून नौदलाने ५९१ बंदरांची तपासणी केली होती. त्यात ९१ बंदरे अतिरेकी हल्ल्यांच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आढळली होती. त्यात रायगडातील २० बंदरांचा समावेश होता. त्यामुळे सागरी सुरक्षा कडक करण्यासाठी या बंदरांवर सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली होती.