
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची रणधुमाळी सुरू असून भाजप-मिंधे-अजित पवार गटातील नेते एकमेकांवर यथेच्छ चिखलफेक करत आहेत. सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनीही भाजपवर चांगलेच तोंडसुख घेतले होते. भाजपनं आमचं कंबरडं मोडलं, गुलाम बनवताहेत आम्हाला, असे म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली होती. एकीकडे त्यांनी भाजपविरोधात बोलायला सुरुवात केली आणि दुसरीकडे त्यांच्या कार्यालयावर छापा पडला. रविवारी भरारी पथकाने शहाजीबापू पाटील यांच्या महात्मा फुले चौकातील कार्यालवार छापा टाकत झाडाझडती घेतली. यामुळे मिंधे गटाचे दिवस भरल्याची चर्चा रंगू लागली.
सांगोल्यात दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली, आणि त्यानंतर रात्री शहाजीबापू पाटील यांनीही सभा घेतली. ही सभा संपत नाही तोच शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर भरारी पथकाने छापा टाकला आणि कार्यालयाची झाडाझडती घेतली. यामुळे गेल्या काही दिवसांपासून भाजप-मिंधे गटात सुरू असलेला संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.
झाडी, डोंगरवाले शहाजी पाटील म्हणतात; भाजपचे राजकारण हिडीस, बलात्कारासारखे
अंबादास दानवे यांचा टोला
दरम्यान, भाजपविरोधात बोलणाऱ्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा पडल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, अंबादास दानवे यांनी एक्सवर पोस्ट करत जबरदस्त टोला लगावला. गुवाहाटीला जाताना ‘झाडी डोंगर हॉटेल’ गोड लागले. आता भाजप विरुद्ध ब्र शब्द उच्चरला की छाप्याची मालिका सुरू झाली. खाताना ऊस गोड लागला, आता तोच ऊस पेकाटात बसतो आहे. ‘ओके मध्ये आहे’, असं म्हणावंच लागेल आता बापू! असे अंबादास दानवे म्हणाले.
गुवाहाटीला जाताना ‘झाडी डोंगर हॉटेल’ गोड लागले. आता भाजप विरुद्ध ब्र शब्द उच्चरला की छाप्याची मालिका सुरू झाली. खाताना ऊस गोड लागला, आता तोच ऊस पेकाटात बसतो आहे. ‘ओके मध्ये आहे’, असं म्हणावंच लागेल आता बापू! #सांगोला #टोले
— Ambadas Danve (@iambadasdanve) December 1, 2025




























































