
पुणे जिल्ह्यातील शिरूर नगर परिषदेच्या प्रचारासाठी पुण्याकडून शिरूरकडे निघालेल्या शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचे अजित पवार गटाचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या भरधाव मर्सिडीज कारने ४ वर्षीय चिमुकलीला जोरदार धडक दिली. रविवारी दुपारी शिरूरच्या बोऱ्हाडेमळा येथे पुणे-अहिल्यानगर महामार्गावर घडली असून जखमी मुलीची प्रकृती गंभीर आहे. शुभ्रा पंढरीनाथ बोऱ्हाडे (वय – 4) असे जखमी मुलीचे नाव असून तिला रात्री पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये हलविण्यात आले.
आमदार ज्ञानेश्वर कटके हे वाघोली येथून शिरूर नगरपरिषदेच्या प्रचारासाठी रविवारी दुपारी शिरूर येथे जात होते. बोऱ्हाडे मळा येथील हुंदाई शोरूम समोर शुभ्रा बोऱ्हाडे ही 4 वर्षीय चिमुकली महामार्ग ओलांडत होती. आमदार कटके यांच्या काळ्या रंगाच्या मर्सिडीज कारने तला उडवली. कटके यांच्या चालकाने जोरदार ब्रेक दाबला परंतु गाडीच्या वेगामुळे शुभ्राला समोरासमोर जोराची धडक बसली. यात ती चेंडूसारखी उडून काही फुट अंतरावर डांबरी रस्त्यावर पडली. यात तिला गंभीर मार लागला असून, दात पडून जबड्याला जबर जखम झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
गाडीची धडक बसताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. आमदार कटके व त्यांच्या कार्यकर्त्यांनी कारमधून खाली धाव घेत शुभ्रा हिला मदत करत उचलले. कटके यांनी दुसऱ्या कारमधून शिरूर गाठले. शुभ्रा हिला तातडीने शिरूरच्या वात्सल्य हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या ठिकाणी तिच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी पुणे येथे केईएम हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
अजित पवार गटाचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या भरधाव मर्सिडीजनं 4 वर्षीय चिमुकलीला उडवलं pic.twitter.com/jc2VuOblm2
— Saamana Online (@SaamanaOnline) December 1, 2025
शिरूरची निवडणूक आजी-माजी आमदारांनी प्रतिष्ठेची केली आहे. प्रचाराला वेळेत पोहचण्यासाठी नेते मंडळींची एकच धावपळ उडाली आहे. रविवाी शिरूर येथे प्रचारातील पदयात्रेला पोहचण्यासाठी आमदार कटके वाघोली येथून शिरूरला भरधाव चालले असताना हा अपघात घडला आहे. पुढऱ्यांची हीच धावपळ शुभ्रा सारख्या सर्वसामान्य बालिकेच्या जीवावर भेटल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
आमदार कटके यांच्याच मर्सिडीज कारने चार वर्षीय बालिकेला उडवल्याची माहिती संपूर्ण शिरूर शहरात पसरली. घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला. मात्र पोलिसांकडून या अपघाताबाबत सांगण्यास नकार दिला. या घटनेबाबत आमच्यापर्यंत ना रुग्णाल्याकडून खबर आली, ना तक्रार करण्यासाठी कोणी आले. यामुळे या घटनेबाबत आम्हाला काहीच माहिती नसल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात येत होते. त्यामुळे नागरिकांकडे संताप व्यक्त करण्यात आला.




























































