
राज्यातील 22 नगरपरिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पुढल्या निवडणुकांमध्ये भरपूर वेळ मिळावा यासाठी निवडणूक आयोगाशी संगनमत करून केलेली ही राजकीय व्यवस्था आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सोमवारी सकाळी माध्यमांशी बोलताना केली. निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला असून निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.
नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत सुरू असलेल्या पैसे वाटपावरही संजय राऊत यांनी टीका केली. नगरपालिका निवडणुका उद्या आहेत आणि शिंदे गटाच्या ‘गुलाबो गँग’ने सांगितले आहे की, आज 1 तारखेला लक्ष्मीदर्शन होणार आहे. आता कुठे कुठे लक्ष्मीदर्शन झाले आहे याची माहिती राज्याच्या निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे. कारण राज्याच्या मंत्र्याने जाहीर केले होते की, लक्ष्मीदर्शन 1 तारखेला सकाळी होणार. त्यामुळे लोक सकाळपासून जागे आहेत आणि काही ठिकाणी मतांमागे 10 हजार, 15 हजार असे लक्ष्मीदर्शन सुरू आहे, असे राऊत म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात आतापर्यंत नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये पैशाचा इतका प्रचंड खेळ कधी झाला नव्हता. मुळात नगरपालिका, नगरपंचायत निवडणुका या राज्याचे मुख्यमंत्री किंवा सरकार कधी लढवत नव्हते. या निवडणुका स्थानिक पातळीवर लोक लढत राहिले. आता मी पाहिले की नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीसाठी सत्तेतील तीन पक्षांनी प्रचारासाठी पाच-सहा हेलिकॉप्टर, खासगी विमाने बूक केली आहेत. हे असे नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत झाले नव्हते. एका एका नगरपालिकेसाठी 15-20 कोटींचे बजेट आहे. ही सत्तेतील तीन पक्षातील स्पर्धा आहे.
निवडणूक आयोगाने कायद्याचा अयोग्य अर्थ लावला, निवडणुका पुढे ढकलणे ही चूक; देवेंद्र फडणवीस यांची टीका
आतापर्यंत आम्ही निवडणुका लढलो, पण या निवडणुका स्थानिक कार्यकर्त्यांवर सोडल्या. आताही तशाच सोडलेल्या आहेत. लोक म्हणतात विरोधक निस्तेज आहेत विरोधक निवडणुकीत आहेत, पण अशा पद्धतीने निवडणुका कधी लढल्या नाहीत. नगपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायतीला इतके कोट्यवधी रुपये खर्च करुन तुम्ही कुणाशी स्पर्धा करताय. या राज्याची निवडणूक संस्कृती जी होती ती पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे, अशी टीका राऊत यांनी केली.
राज्याला एक संस्कृती होती, संस्कार होता तो गेल्या चार पाच वर्षात देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या सरकारने पूर्णपणे उद्ध्वस्त केलेला आहे. आपापसात मारामाऱ्या सोडून द्या पण नगरपालिका निवडणुकीत किती पैसे खर्च करावेत याला काही मर्यादा राहिलेल्या नाहीत. याचे कारण तीन पक्षातील स्पर्धा, तू मोठा की मी मोठा, असेही राऊत म्हणाले.
शिवसेना-मनसे युतीवर काय म्हणाले?
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोघांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे. जागावाटपावर बैठका सुरू आहेत आणि योग्य दिशेने ही चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात उत्तम संवाद सुरू आहे. एकमेकांना भेटत आहेत, चार दिवसांपूर्वीही भेट झाली. या भेटीत राज ठाकरे यांनी महानगरपालिकेसंदर्भात एक प्रेझेंटेशन तयार केले होते, ते दाखवले. ते उत्तम प्रेझेंटेशन आहे हे उद्धव ठाकरे यांनी मला सांगितले. त्याच्यामुळे कुणाला चिंता करण्याचे कारण नाही. हे शिंदे, मिंधे काय म्हणतात त्यांना सांगा मुंबईसाठी संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला तेव्हाच्या काँग्रेस सत्ताधाऱ्यांनी प्रचंड पैसा टाकला, पण मराठी माणूस एकजुटीने उभा राहिला आणि मुंबई महाराष्ट्रात राहिली. ही मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान तुमचे दिल्लीतील बापजादे करताहेत मिस्टर शिंदे. शहा, मोदी आणि अदानी हे त्रिकूट महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचा जो प्रयत्न करतोय तो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एकजूट हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही, असेही संजय राऊत यांनी ठणकावले.




























































