
संगमेश्वर ते साखरपा या राज्य मार्गाची पावसाळ्यात दुरावस्था झाली होती. या मार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत होता. मात्र लवकरच या मनस्तापातून प्रवाशांची सुटका होणार असून साखरपा ते देवरुख या मार्गाची दुरुस्ती पूर्ण झाली असून देवरुख ते संगमेश्वर या मार्गाची दुरुस्ती येत्या आठवड्याभरात पूर्ण करू, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभाग देवरुखचे उपअभियंता वैभव जाधव यांनी दिले आहे.
सध्या संगमेश्वर ते बुरंबी या सहा किमी लांबीच्या मार्गावर असंख्य खड्डे पडले असून या मार्गावरून होणारा प्रवास मुंगीच्या गतीने होत आहे. याबरोबरच रस्त्यालगत घरे असणाऱ्या नागरिकांच्या घरात धूळ जाऊन कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबरोबरच वयोवृद्ध प्रवाशांना खड्ड्यातून प्रवास करताना गंभीर स्वरूपाच्या इजा पोहोचत आहेत. वाहन चालकांना वाहन चालवताना धुळीचा सामना करावा लागत आहेच शिवाय खड्ड्यामुळे वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे. याबरोबरच खड्ड्यामुळे सातत्याने दुचाकींचे अपघात घडत आहेत. याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वैभव जाधव यांनी संगमेश्वर ते बुरंबी या सर्वाधिक धोकादायक मार्गाची आवश्यक ती दुरुस्ती येत्या आठ दिवसात पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.
गेले काही दिवस साखरपा ते देवरूख या मार्गाची दुरुस्ती सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. वाहन चालकांना आणि प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेता. ठेकेदार कंपनीने या मार्गाच्या दुरुस्तीसाठी दोन टीम तयार केल्या असून यामुळे दुरुस्तीचे काम वेगाने पूर्ण करण्याचा बांधकाम विभागाचा आणि ठेकेदार कंपनीचा प्रयत्न आहे, असेही जाधव यांनी सांगितले. ठेकेदार कंपनीकडून होणाऱ्या दुरुस्तीचे हे शेवटचे वर्ष आहे. संगमेश्वर ते साखरपा या रस्त्याची नव्याने बांधणी करण्याकरता एशिया डेव्हलपमेंट बँक तर्फे निधी उपलब्ध व्हावा म्हणून चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांच्या सूचनेवरून तसा प्रस्ताव आमदार निकम यांच्याकडे देण्यात आला असल्याचेही उपअभियंता वैभव जाधव यांनी सांगितले. संगमेश्वर साखरपा हा रस्ता नव्याने बांधणी करताना तो सिमेंट काँक्रीटचा असेल अथवा डांबरी याबाबत आत्ताच काही सांगता येणार नाही, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.
संगमेश्वर साखरपा रस्त्याच्या दुतर्फा असणारे गवत अथवा झाडी झुडपे कापून, गाईड स्टोन आणि मोऱ्याना रंग लावण्यासाठी तसेच झाडांना रंगांचे पट्टे ओढण्यासाठी २५ लाखांची निविदा काढण्यात आली आहे. या निवेदेतील अटी आणि शर्तीनुसार हे काम हाती घेण्यात येणार आहे. संगमेश्वर ते लोवले यादरम्यान महावितरणच्या ठेकेदाराने रस्त्याच्या साईड पट्टीवर बेदरकारपणे उतरवून ठेवलेल्या सिमेंटच्या पोलांबाबत आता सार्वजनिक बांधकाम विभाग कोणती कारवाई करणार याकडे पादचारी आणि वाहनचालकांचे लक्ष लागले आहे. पुढील आठवडाभरात संगमेश्वर ते बुरंबी दरम्यान रस्त्याची आवश्यक दुरुस्ती बांधकाम विभागाच्या आश्वासनानुसार पूर्ण होईल, अशी अपेक्षा वाहन चालकांनी व्यक्त केली आहे.




























































