
पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक 2 मध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पनवेलमधील तोंडरे गावातील मतदार यादीत एका व्यक्तीला चक्क 268 मुले असल्याचे आढळून आले आहे. एकाच पत्त्यावर या 268 जणांची नावे समाविष्ट करण्यात आली असून या प्रकारामुळे निवडणूक आयोगाचा ‘बोगस’ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रातील सर्व प्रभागांतील मतदार यादीत मोठ्या प्रमाणात बोगस नावे नोंदवली गेल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, तोंडरे गावातील प्रभाग 2 मधील 51 क्रमांकाच्या यादीत निवडणूक आयोगाने बोगसगिरीची पराकाष्ठा केल्याचे दिसून आले आहे. या यादीत ‘हरीश’ नावाच्या व्यक्तीला तब्बल 268 मुलांची बोगस नोंद करण्यात आली आहे. एकाच घराच्या पत्त्यावर या 268 जणांची नावे नोंदवली असून त्याहून धक्कादायक बाब म्हणजे, हे घरच अस्तित्वात नसल्याचा पर्दाफाश शेकापचे माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी केला आहे.
“कोणत्या एका पक्षासाठी ठरवून केले जात आहे काय?”
“महाभारतात धृतराष्ट्राला 101 मुले असल्याचे वाचले होते. पाकिस्तानातही एका व्यक्तीला 38 मुले असल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती; पण निवडणूक आयोगाने आता एकाच घरात 268 मुले ‘जन्माला घातली’ आहेत… याला काय म्हणावे?” असा संतापही म्हात्रे यांनी व्यक्त केला.
50, 47 आणि 48 क्रमांकाच्या यादीत कल्याण (पूर्व) येथील मतदारांची नावे घुसडली गेली आहेत. यादी क्रमांक 184 आणि 185 मध्ये ‘पैलास पर्व’ आणि ‘बालाजी निवास’ या इमारतींच्या नोंदी आहेत; मात्र या इमारतींचे अस्तित्वच नाही. ही अत्यंत गंभीर बाब असून, “हे कोणत्या एका पक्षासाठी ठरवून केले जात आहे काय? की पैसे देऊन बोगस नावे यादीत टाकली जातात?” असा संतप्त सवालही म्हात्रे यांनी उपस्थित केला.
























































