
तळा शहरातील ऐतिहासिक तळगड किल्ल्यावर शिवकालीन गुप्त दरवाजा सापडला आहे. हा गुप्त दरवाजा शोधण्यासाठी दुर्गरत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांनी विशेष मेहनत घेतली. अभ्यासकांकडून गडाची माहिती, नकाशा घेतला आणि शिवभक्तांनी फावडे, टिकाव, पहारी हाती घेऊन गुप्त दरवाजा शोधून काढला. हा दरवाजा शोधण्यासाठी दोन मोहिमा राबवण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1648 साली तळगड आदिलशहाकडून जिंकून घेतला. त्यानंतर 1659 साली अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी सिद्दीने तळगडाला वेढा घातला होता, पण अफजलखानाच्या पराभवाची बातमी मिळाल्यावर सिद्दीने वेढा उठवला. तळगड हा किल्ला तसा लहान आहे. त्यामुळे याचा घेरपण लहान आहे. हा गड दक्षिणोत्तर पसरलेला आहे. या तळगडावर गुप्त दरवाजा असल्याची माहिती दुर्गरत्न प्रतिष्ठानला मिळाली. त्यानुसार प्रतिष्ठानच्या सदस्यांनी अभ्यासकांची भेट घेतली. अभ्यासकांकडून गडाचा नकाशा घेतला आणि गडाची माहिती घेतली. त्यावेळी गडावर एक गुप्त दरवाजा असल्याचे लक्षात आले.
रांगोळी सजावट
पहिल्या मोहिमेत 15 ते 20 सदस्यांनी अर्धा मातीचा ढिगारा उपसून काढला. पुन्हा दुसऱ्या दिवशी 45 ते 50 सदस्यांनी विशेष मेहनत घेऊन चोर दरवाजा शोधून काढला. दरवाजाचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला. त्याठिकाणी आकर्षक रांगोळी काढून फुलांच्या हाराने दरवाजा परिसर सजवण्यात आला.


























































