
बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी सायन फ्लायओव्हरच्या पुनर्निर्माण कामाचा वेग वाढवण्याचे निर्देश दिले असून, हे संपूर्ण काम पुढील वर्षी 31 मेपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मंगळवारी झालेल्या आढाव्यात त्यांनी संबंधित विभागांना स्पष्ट सूचना देत विलंब टाळण्यावर भर दिला. त्यांनी सांगितले की, सध्या कामाला अपेक्षित गती मिळत असून, रोजच्या प्रगतीवर स्वतः लक्ष ठेवले जात आहे.
एलबीएस मार्गावरील पहिले अंडरपास अंतिम टप्प्यात असून ते चालू महिन्यात पूर्ण होणार आहे. तसेच धारावी बाजूचा दुसरा अंडरपास फेब्रुवारीच्या अखेरीपर्यंत तयार करण्यात येणार आहे. दोन्ही अंडरपास सुरू झाल्यानंतर या परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास बीएमसी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
सदर प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे गर्डर लाँचिंग. फ्लायओव्हरच्या उत्तरीय बाजूचा गर्डर मार्चच्या पहिल्या आठवड्यात लाँच केला जाणार आहे. तर दक्षिणेकडील भागाचा गिर्डर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लाँच करण्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. हे दोन्ही टप्पे सुरळीत पार पडणे अत्यंत गरजेचे असल्याचेही अधिकाऱ्यांनी नमूद केले.
या दोन्ही लाँचिंगनंतर फ्लायओव्हरखालील रेल्वे हद्दीतले उर्वरित काम पूर्ण करण्यास सुरुवात होईल. बांगर यांनी स्पष्ट केले की, रेल्वे विभागाशी समन्वय साधून ही कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण केली जातील. सायन परिसरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा भार असलेल्या या फ्लायओव्हरच्या पुनर्निर्माणानंतर प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.


























































