
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये घोळ घालून मतदारांमध्ये मनस्ताप निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाने केले आहे. राज्य सरकारने अशा राज्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग आणलाच पाहिजे अन्यथा हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव आणू, असा इशारा कॉँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिला आहे.
निवडणूक आयोग दिवसाढवळय़ा लोकशाहीचा गळा घोटत आहे. लोकशाहीचा खून केला जात आहे. त्यामुळे जनतेमध्ये चीड निर्माण झाली आहे. सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर निवडणूक आयुक्तांच्या विरोधात आर्टिकल 243 अंतर्गत महाभियोग आणण्याचा प्रस्ताव ठेवत आहोत. स्वतः मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली असल्याने आता त्यांनी महाभियोग आणावा. आमचा त्यांना पाठिंबा असेल, असे नाना पटोले म्हणाले.
राज्य सरकारला आमची भूमिका राजकीय वाटत असेल; पण गुन्हा केल्यानंतर गुन्हेगाराला सोडले तर याला काय म्हणायचे? राज्य सरकार महाभियोग आणणार नसेल तर आयोग व राज्य सरकार यांचे साटेलोटे असल्याचे उघड होईल, असे पटोले म्हणाले.


























































