
घाटकोपर परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱया विविध समस्यांबाबत शिवसेनेच्यावतीने शिधावाटप नियंत्रण कार्यालयात धडक देत प्रशासनाला जाब विचारण्यात आला. केवायसीच्या नावे सुरू असलेला गोंधळ कमी करा, अशी मागणी यावेळी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.
केवायसी प्रक्रियेच्या निमित्ताने अनेक नागरिकांच्या रेशनकार्डवरील कुटुंबीयांची नावे अनावश्यकरीत्या रद्द होण्याचे प्रमाण वाढले असून त्यामुळे लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नावे रद्द झालेल्या लोकांना पुढील दोन ते तीन महिने अन्नधान्य दिले जात नाही, अशा अनेक तक्रारी शिवसेना शाखेत येत होत्या. या पार्श्वभूमीवर ईशान्य मुंबई विभागप्रमुख सुरेश पाटील यांचा सूचनेनुसार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिधावाटप नियंत्रण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.
विधानसभा कार्यालय प्रमुख प्रकाश वाणी, माजी नगरसेवक प्रदीप सावंत, विधानसभा समन्वयक प्रसाद कामतेकर, शाखाप्रमुख विशाल चावक, शिक्षकेतर कर्मचारी सेनेचे राज्य सचिव सचिन भांगे, शाखा संघटक चंद्रकांत हळदणकर, ग्राहक कक्षाचे रमेश सावंत, नितीन रेणुसे, वसंत पाटील आदी उपस्थित होते.
त्वरित सुधारणात्मक पावले उचला
नागरिकांना होणारा त्रास कमी होऊन प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुलभता आणण्यासाठी संबंधित विभागाने लक्ष घालण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने शिधावाटप अधिकारी चैतन्य वानखेडे व राकेश गावडे यांच्याकडे करण्यात आली. वयोवृद्ध नागरिकांना वारंवार कार्यालयात ये-जा करावी लागणे, दस्तऐवजांची पडताळणी आणि नाव पुन्हा जोडण्यासाठी गैरसोयींचा सामना करावा लागत आहे, याकडे शिवसेनेने लक्ष वेधत प्रशासनाने त्वरित सुधारणात्मक पावले उचलावीत, अशी मागणी केली.


























































