परळीत स्ट्राँग रूम बाहेर रात्री हाय व्होल्टेज ड्रामा; नगर परिषद कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप, तणावाचे वातवरण

Parli Strong Room, High Voltage Drama, Parli Nagar Parishad, Deepakt Deshmukh, NCP Sharad Pawar

परळी मध्ये स्ट्राँग रूम असलेल्या नगरपरिषदेसमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख आणि नगरपरिषद कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचे दिसून आले यावेळी रात्री नगरपरिषद कार्यालयासमोर तणावाचे वातावरण झाले होते.

बुधवारी रात्री 11 वा. दीपक देशमुख हे नगर परिषदेत स्ट्राँग रुमची पाहणी करण्यासाठी गेले असताना नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी अरेरावीची भाषा केल्याचा आरोप देशमुख यांनी नगरपरिषद कर्मचाऱ्यावर केला. यावेळी नगरपरिषदेसमोर मोठ्या प्रमाणात देशमुख समर्थक जमा झाले. दीपक देशमुख आणि त्यांच्या समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. दरम्यान नशेत शिवीगाळ केल्याचा आरोप केलेल्या कर्मचाऱ्याचे मेडिकल करण्याची मागणी यावेळी देशमुख यांनी केली. या संपूर्ण प्रकरणाची माहिती खासदार बजरंग सोनवणे यांना फोनवरून दिली.

निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर यांनी जमावाला शांततेचे आवाहन केले. दरम्यान पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणा बाहेर बाहेर जाऊ नये या करता गेट बाहेर उभे असलेल्या जमावावर सौम्य लाठीमार केला. साधारण दोन तास या ठिकाणी तणावाचे वातावरण होते. नगरपरिषदेबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

याआधी बुधवारी सकाळी नगर परिषद निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर नगरपरिषद इमारतीत असलेल्या स्ट्राँग रूम मध्ये ईव्हीएम मशीन मध्ये ठेवण्यात आल्या. या ठिकाणच्या कर्मचाऱ्यावर आमचा विश्वास नसल्याचे सांगत आमची राहण्याची व्यवस्था करावी अशी मागणी देखील दीपक देशमुख यांनी केली होती.

त्यानंतर या स्ट्राँग रूमचे सीसीटीव्ही फुटेज उमेदवाराला पाहता यावे यासाठी खाली असलेल्या पार्किंग मध्ये टिव्हीची व्यवस्था करण्यात आली.