विराट, पांढरी जर्सी पुन्हा वाट पाहतेय…

<<मंगेश वरवडेकर>> 

विराट, रांची पाहिलं, रायपूर पाहिलं आणि मग आम्ही आमच्याच हृदयाचं ऐकलं. ते एकच म्हणत होतं, हा माणूस कसोटीचा आहे! तुझा प्रत्येक फटका सीमारेषा ओलांडतो, पण आमच्या आठवणी थेट लॉर्ड्सपर्यंत पोहोचताहेत. तुझ्या बॅटनं चेंडू उडतो, पण आमच्या मनात पुन्हा अॅडलेड उजाडतंय. आज तू निळ्या जर्सीत खेळतोयस, पण आम्हाला प्रत्येक वेळी दिसते तीच पांढरी जर्सी. तू घामानं ओलाचिंब झालेला, अभिमानानं ताठ उभा असलेला, क्षणाक्षणाला संघात जोश भरताना, मार्गदर्शन करण्यासाठी धावपळ करताना.

आम्ही रांचीमध्ये ओरडलो, रायपूरमध्ये हुंदका आला आणि म्हणून हे पत्र लिहितोय, कारण शब्द फार झालेत, आता काळीज बोलतंय. तू म्हणतोस, ‘सध्या कसोटीचा विचार नाही.’ ते आम्हाला समजतं, खूप समजतं. खेळ इच्छा म्हणून नाही तर शरीराच्या साक्षीनं खेळायचं असतं, हे आम्हालाही उमगलंय. पण विराट, हिंदुस्थानची कसोटी आज अडखळतेय, धडपडतेय, वेळ चुकतेय, धावा थांबल्यात, आत्मविश्वास ढासळत चाललाय आणि त्या प्रत्येक घसरत्या पावलात तुझं नाव ओरडलं जातंय. खरं सांगायचं तर आपला कसोटी संघ कणा शोधतोय आणि त्या कण्यावर फक्त तुझीच सही आहे.

तुझ्या नुसत्या सावलीनं गोलंदाजांच्या घामाच्या धारा सुटतात. तू येतोस तेव्हाच सामना सुरू होतो आणि तू नसतोस तेव्हा फक्त स्कोअर चालू असतो. आम्हाला विजय हवेत विराट, जे आम्ही पाहिलेत. आम्हाला पुन्हा हवाय तो लढा, तो श्वास, ती जिद्द, ती ठिणगी. तो कपाळावरचा घाम, तो अस्वस्थ चेहरा, ती शेवटपर्यंत उभी राहणारी मान,  आम्हाला परत हवाय तो विराट.

आणि मग आठवणी येतात विराटच्या कसोटी प्रवासाच्या. प्रारंभीचा तो तरुण विराट आठवतो, ज्याने कसोटी जणू वन डेसारखी खेळायला घेतली होती, पण हळूहळू त्याने आपल्या खेळात संयमाची भिंत उभी केली. तो काळ आठवतो, जेव्हा तो ऑफ-स्टम्पबाहेर जाणारा प्रत्येक चेंडू ‘नजर’ भरून सोडायचा. 2014 चा तो कटू इंग्लंड दौराही आठवतोय. पण त्या कटुतेतूनच 2018 चा विराट जन्माला आला ज्याने इंग्लंडच्या भूमीवर धावा केल्या नाहीत, तर सन्मानही परत मिळवला.

ऑस्ट्रेलियातील 2014–15 चा तो काळ आठवा. अॅडलेड, मेलबर्न, सिडनी जिथे विराटने शतके म्हणून काढली नाहीत, तर त्याने गोलंदाजांच्या पंखांनाच आग लावली होती. त्याच अॅडलेडच्या मातीत त्याने दोन्ही डावांत शतके झळकावली, हे केवळ विक्रम नव्हते. ते एक निवेदन होते. ‘हिंदुस्थान इथेही विसावणार नाही, तो इथे जिंकणार आहे. 2018 च्या ऑस्ट्रेलिया दौऱयात कर्णधार म्हणून त्याने केवळ संघ नेला नाही; तो त्यांच्या पुढे उभा राहिला. पहिल्यांदाच हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली आणि विराटचे नाव इतिहासात कोरला गेला.

आफ्रिकेच्या वेगवान खेळपट्टय़ांवर त्याने जो खेळ दाखवला, तो फर्मानच होता. न्यूझीलंडच्या भयानक सीम मूव्हमेंटमध्ये त्याने धीर सोडला नाही. वेस्ट इंडीज, श्रीलंका, इंग्लंड या प्रत्येक ठिकाणी विराटने धावांसोबत मानही मिळवला. त्याचा स्ट्राइक रेट नव्हे, तर त्याचा स्टॅण्ड, त्याचा खेळ लोकांच्या लक्षात राहिला. तो कधी आक्रमक होता, कधी संयमी; पण कधीही हरलेला नव्हता.

आज तू ‘नाही’ म्हणतोयस आणि तो निर्णयही आम्हाला मान्य आहे. पण विराट, कसोटी  तुला सोडतेय? ती रोज आम्हाला विचारतेय, तो परत कधी येणार? ती पांढरी जर्सी अजून तुझ्याच कपाटात आहे. पण त्या कपाटाला तू कुलूप लावू नकोस. ती तिथे धूळ खात पडलेली नाहीय, याची आम्हाला कल्पना आहे. ती उशाशी ठेवलेलं एक स्वप्न आहे. तू उद्या ये किंवा परवा, पण येणार आहेस यावर आमचा विश्वास आहे. आणि त्यादिवशी हिंदुस्थानचा संघ नव्हे, पुन्हा आत्मा मैदानात उतरेल.

हे पत्र आदेश नाही, तुझ्या असंख्य चाहत्याची विनवणी आहे. ही मागणी नाही, ही भक्ती आहे. हिंदुस्थानला आज तुझी विकेट नकोय, त्याला तुझा धीर हवाय, तुझा आवाज हवाय, तुझी उपस्थिती हवीय. शेवटी एवढंच सांगेन, तू कसोटी सोडलेली नाही. कसोटी अजून तुला धरूनच आहे!