
नरेंद्र मोदी यांचे ‘खासमखास’ अशी ओळख असलेले ‘पीएमओ’तील ‘ओएसडी’ हिरेनभाई जोशी यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याच्या चर्चेने आज राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. काँग्रेसने लगेचच संधी साधत याबाबत खुलासा करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली. मात्र जोशी यांनी पुन्हा काम सुरू केल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला.
हिरेन जोशी हे पीएमओतील संवाद आणि माहिती-तंत्रज्ञान विभागाचे ओएसडी म्हणून काम करतात. त्यांना सहसचिव पदाचा दर्जा आहे. मोदी सरकारसाठी मीडिया मॅनेज करण्याची जबाबदारी हिरेन जोशी यांच्यावर आहे. जोशी हे मीडियाने काय कव्हरेज करावे आणि काय टाळावे हेदेखील ठरवत असल्याचे बोलले जाते. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी आज तसा आरोप केला.
जोशी हे 24 नोव्हेंबरनंतर पत्रकारांशी संबंधित महत्त्वाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरून गायब झाले होते. त्यामुळे त्यांनी गुपचूप राजीनामा दिल्याची चर्चा होती. काँग्रेसने यावरून सरकारवर हल्ला चढवला. काँग्रेसने त्यांच्यावर बेटिंग अॅपशी संबंधित असल्याचा आरोप केला, मात्र आज ते पुन्हा वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर सक्रिय झाले आहेत.
मोदींच्या नजरेत कसे आले?
हिरेन जोशी हे उच्चशिक्षित आहेत. पुण्यात त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग केले असून ग्वाल्हेर येथून पीएचडी केली आहे. गुजरातमधील एका सरकारी कार्यक्रमात आलेला तांत्रिक अडथळा दूर केल्यामुळे ते 2008 साली मोदींच्या नजरेत आले आणि काही दिवसांतच त्यांचे निकटवर्तीय बनले.




























































