
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयक मंजूर झालं आहे. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतर सरकार सिगारेट आणि तंबाखूसारख्या उत्पादनांवर अतिरिक्त कर लादेल. या वाढीव करातून निर्माण होणारे बजेट राष्ट्रीय सुरक्षेसाठी वापरले जाईल, असे सरकारचे म्हणणे आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी लोकसभेत याची घोषणा केली.
दोन दिवसांच्या चर्चेनंतर लोकसभेत हे विधेयक मंजूर करण्यात आले. याबद्दल बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, “कारगिल युद्ध तयारीअभावी घडले. लष्कराच्या जनरल्सनी अहवाल दिला होता की, १९९० च्या दशकाच्या सुरुवातीपासून बजेटच्या अडचणींमुळे सैन्याकडे केवळ ७०-८० टक्के शस्त्रे, दारूगोळा आणि उपकरणे होती. हिंदुस्थानावर अशी परिस्थिती पुन्हा येऊ नये, अशी आमची इच्छा आहे.”
त्या म्हणाल्या आहेत की, “हे विधेयक सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा मजबूत करण्याचा मार्ग मोकळा करते. मंत्रालयाचे लक्ष सार्वजनिक आरोग्य धोके कमी करण्यावर आहे. हा उपकर राष्ट्रीय सुरक्षेच्या आघाडीवर देखील मदत करेल.”


























































