राष्ट्रपती भवनात आयोजित पुतीन यांच्या डिनरमध्येही कुरघोडीचे राजकारण! राहुल गांधी, खरगेंऐवजी शशी थरूर यांना निमंत्रण

हे सरकार विरोधी पक्षनेत्यांना विदेशातील नेत्यांना भेटू देत नाही, असा आरोप लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केला होता. तसेच अशा भेटींची सरकारला भीती वाटतेय, अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली होती. हिंदुस्थान दौऱ्यावर आलेल्या पुतीन यांच्यासाठी राष्ट्रपती भवनात विशेष डिनरचे आयोजन करण्यात आले. पण या डिनरमध्येही कुरघोडीचे राजकारण करण्यात आल्याचा आरोप आहे.

राशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा दोन दिवसांचा दौरा आज संपणार आहे. आज रात्री ते रशियाला परतणार आहेत. यापूर्वी राष्ट्रपती भवनमध्ये पुतीन यांच्या सन्मानार्थ डिनरचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या डिनरमध्येही सरकारकडून कुरघोडीचे राजकारण होत आहे. या डिनरला लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. या डिनसरसाठी काँग्रेस खासदार शशी थरूर यांना निमंत्रित केले आहे. यावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

लोकसभा आणि राज्यसभेच्या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या सन्मानार्थ आयोजित डिनरला निमंत्रण दिले जाणार की नाही? या बाबत तर्कवितर्क लावले जात होते. पण दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही, हे आता स्पष्ट झाले असल्याचे जयराम रमेश यांनी ट्विट केले आहे. आणि निमंत्रण स्वीकारणाऱ्या शशी थरूर यांना नाव घेता यांना टोलाही लगावला आहे.

राष्ट्रपती भवनात पुतीन यांच्या सन्मानार्थ आयोजित डिनरसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. दिग्गज राजकीय नेते, उद्योजकांपासून ते कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांना या डिनरचे निमंत्रण देण्यात आले आहे.