सोशल मीडिया अकाऊंट तपासूनच एच-1बी व्हिसा! अमेरिकेत 15 डिसेंबरपासून लागू होणार नवा नियम 

अमेरिकेतील एच-1बी व्हिसा मिळवणे आता आणखी कठीण झाले आहे. अमेरिकन व्हिसासाठी भरमसाट फी आकारल्यानंतर ट्रम्प सरकारने आता यासाठी आणखी एक नवीन नियम लावला आहे. एच-1बी व्हिसासाठी अर्ज करणाऱ्याला आता सोशल मीडिया अकाऊंटमधील स्वतःच्या प्रोफाईलवर जाऊन प्रायव्हसी सेटिंग्सला सार्वजनिक करावे लागणार आहे. अर्ज करणाऱ्या व्यक्तीची सोशल मीडिया खाती तपासल्यानंतरच त्याला एच-1बी व्हिसा द्यायचा की नाही, हे ठरवले जाणार आहे. ट्रम्प प्रशासनाने यासंबंधी सर्व दूतावासांना निर्देश जारी केले आहेत. हा नवीन नियम येत्या 15 डिसेंबर 2025 पासून लागू केला जाणार आहे. त्यामुळे या व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांची डोकेदुखी आणखी वाढणार आहे.

जगभरातील लोक हे अमेरिकेचा व्हिसा मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. यामध्ये 70 टक्क्यांहून अधिक हिंदुस्थानी नागरिक आहेत, परंतु नव्या नियमानुसार, आता एच-1बी अर्जदारांना त्यांचे सोशल मीडिया खाते सार्वजनिक करावे लागेल. जेणेकरून अमेरिकन अधिकारी अर्जदाराचे प्रोफाईल, सोशल मीडिया पोस्ट आणि लाईक्स पाहू शकतील. जर अर्जदाराची कोणतीही सोशल मीडिया ऑक्टिव्हिटी अमेरिकेच्या हिताच्या विरोधात दिसली, तर त्यांना एच-1बी व्हिसा जारी केला जाणार नाही. एच-1बीच्या आश्रितांसाठी म्हणजेच पत्नी, मुले आणि पालक यांना एच-4 व्हिसासाठीदेखील सोशल मीडिया प्रोफाईल सार्वजनिक करणे आवश्यक असणार आहे. ऑगस्टपासून स्टडी व्हिसा एफ-1, एम-1 आणि जे-1 तसेच व्हिजिटर व्हिसा बी-1, बी-2 साठी सोशल मीडिया प्रोफाईल सार्वजनिक करण्याची सक्ती लागू करण्यात आली आहे. एच-1बी व्हिसा मिळवण्यात हिंदुस्थान देश अव्वल आहे.

19 देशांच्या ग्रीन कार्डवर बंदी

अफगाणी नागरिकांकडून अमेरिकेत नॅशनल गार्डवर केलेल्या गोळीबारानंतर ट्रम्प सरकारने 19 देशांच्या ग्रीन कार्डवर बंदी घातली आहे. ज्या देशांवर बंदी घातली आहे, त्यामध्ये अफगाणिस्तान, बर्मा, बुरूंडी, चाड, कांगो, क्यूबा, इक्वेटोरियल गिनी, इरिट्रिया, हैती, इराण, लाओस, लीबिया, सिएरा लियोन, सोमालिया, सुदान, टोगो, तुर्कमेनिस्तान, व्हेनेज्युएला आणि येमेन या देशांचा समावेश आहे.

एच-1बी व्हिसा काय आहे?

अमेरिकेत जाणाऱ्या जगभरातील डॉक्टर, अभियंता, सॉफ्टवेअर व्यावसायिक यांसारख्या उच्च कुशल व्यावसायिकांना एच-1बी व्हिसा जारी केला जातो. हा व्हिसा 3 वर्षांसाठी जारी केला जातो. हा व्हिसा मिळवण्याची फी आधी 9 हजार अमेरिकन डॉलर इतकी होती, परंतु सप्टेंबर महिन्यात ही फी वाढवून 1 लाख अमेरिकन डॉलर केली आहे. हिंदुस्थानातील इन्पहसिस, टीसीएस, विप्रो, कॉग्निझंट आणि एचसीएल यांसारख्या कंपन्या सर्वाधिक आपल्या कर्मचाऱ्यांना एच-1बी व्हिसा स्पॉन्सर करतात, परंतु या कंपन्यांना आता जास्त पैसे मोजावे लागतील.