
सिंधुदुर्ग किल्ल्याजवळील जेटीचा खालील भाग पोकळ बनत चालला असल्याने जेटी धोकादायक बनत आहे. जेटीच्या खालील भरावाचे दगड निखळून ओहोटीच्या वेळी जेटीचे धोकादायक रूप निदर्शनास येत आहे. यामुळे ओहोटीच्या वेळी जेटीकडे प्रवासी होडय़ा लावणे कठीण बनले आहे. याच कारणास्तव आज सायंकाळी 4 वाजल्यापासून किल्ला होडी सेवा बंद ठेवावी लागली. तसेच किल्ला जेटी, मालवण बंदर जेटीकडे मोठय़ा प्रमाणावर गाळ साचल्याने होडी व्यावसायिकांना अनेक अडचणी येत आहेत.
मालवणच्या समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गवर जाण्यासाठी मालवण बंदर जेटी ते किल्ला अशी होडी सेवा आहे. या होडी सेवेसाठी काही वर्षांपूर्वी किल्ल्याला लागून जेटी बांधण्यात आली. या जेटीमुळे पर्यटकांना होडीतून सुरक्षितरीत्या उतरविणे व पुन्हा होडीत चढविणे सुलभ झाले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या जेटीच्या बांधणीवेळी समुद्रात घातलेला दगडांचा भराव पोकळ होत चालला आहे. यातील काही दगड निसटले असून जेटीचा खालील भाग धोकादायक स्थितीत दिसत आहे.
मालवण बंदर जेटी परिसरात वाहनतळाचे काम करण्यात आल्यावर त्यातून काढलेली माती व भराव जेटी परिसरातच किनाऱयालगत टाकण्यात आला आहे. गेली काही वर्षे हा मातीचा ढिगारा तसाच असून पावसाळ्यात माती वाहून समुद्रात जाते. हा ढिगारा हटविण्यात यावा, अशी मागणी बंदर विभागाकडे ऑक्टोबर महिन्यात झालेल्या बैठकीत किल्ला होडी व्यावसायिकांनी केली होती. त्याबाबत लेखी निवेदनही देण्यात आले आहे.
गाळ साचल्याने अडचणी
सिंधुदुर्ग किल्ला जेटीच्या मार्गावर तसेच मालवण बंदर येथील दोन्ही जेटीच्या मार्गावर मोठय़ा प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे ओहोटीच्या वेळी दोन्ही जेटीकडे होडय़ा लावणे कठीण होते. काही वेळा होडी सेवा बंददेखील ठेवावी लागते. यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे. तसेच होडी व्यावसायिकांनाही नुकसान सहन करावे लागत आहे.

























































