देशाचा पाया उद्ध्वस्त करण्याचा भाजपचा प्रयत्न; नेहरूंच्या कार्याची चिकित्सा मान्य, पण बदनामी अमान्य – सोनिया गांधी

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची बदनामी करण्याचा कार्यक्रमच सध्याच्या सत्ताधाऱयांनी हाती घेतला आहे. मात्र, नेहरूंचा वारसा पुसण्यापुरताच हा कार्यक्रम मर्यादित नसून, देशाचा सामाजिक, राजकीय व आर्थिक पायाच उद्ध्वस्त करण्याचा हा प्रयत्न आहे, अशी टीका काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केली.

नवी दिल्लीतील जवाहर भवन येथे नेहरू सेंटर इंडियाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. नेहरूंना सरकारी पैशातून बाबरी मशीद बांधायची होती, असे वक्तव्य संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले होते. त्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी सत्ताधाऱयांच्या खोटारडेपणावर हल्ला चढवला. ‘नेहरूंसारख्या उत्तुंग व्यक्तीच्या कार्याचे विश्लेषण, चिकित्सा होणे आणि त्यांच्यावर टीका होणे हे स्वाभाविक आहे. त्याविषयी आक्षेप असण्याचे कारण नाही. मात्र, स्वार्थासाठी इतिहासाचा विपर्यास करताना नेहरूंचा बहुआयामी वारसा संपवण्याचा पद्धतशीर प्रयत्न करणे हे कधीच मान्य होण्यासारखे नाही, असे सोनिया म्हणाल्या.

द्वेष पसरवणे हाच उद्योग

नेहरूंच्या बदनामीचा कार्यक्रम हाती घेणाऱ्यांनी ना कधी स्वातंत्र्यलढय़ात सहभाग घेतला ना घटनानिर्मितीमध्ये त्यांची काही भूमिका होती. द्वेष पसरवणे हाच उद्योग ही विचारधारा करत आली आहे. त्यातूनच महात्मा गांधी यांची हत्या झाली. त्यांच्या खुन्यांचेही आज उदात्तीकरण केले जात आहे. ही तीच भ्याड आणि धर्मांध विचारधारा आहे, असे सोनिया गांधी यांनी सुनावले.

पुढचा मार्ग निश्चितच खडतर आहे, मात्र पंडित नेहरूंच्या बदनामीच्या मोहिमेविरुद्ध उभे राहणे आणि तिचा प्रतिकार करणे याला पर्याय नाही.’-  सोनिया गांधी