
महाराष्ट्राचे मिनी कश्मीर म्हणून ओळख असलेल्या वाई, जावळी आणि महाबळेश्वर या संपूर्ण स्ट्रॉबेरी पट्टय़ात हवामानाचा उलटफेर सुरू झाला आहे. सध्याच्या ढगाळ वातावरण, हवेतील जड धुके आणि सतत वाढणारी आर्द्रता याचा मोठा फटका स्ट्रॉबेरी पिकाला बसत आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरीच्या उत्पादनात लक्षणीय घट होणाची शक्यता कृषी तज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे.
नोव्हेंबर–डिसेंबर या काळात कडाक्याची थंडी असणे अत्यावश्यक असते. हीच थंडी स्ट्रॉबेरीच्या फुलधारणा, फळांची वाढ आणि गुणवत्तेसाठी महत्त्वाची असते. मात्र, वातावरणाने अचानक पलटी मारल्याने शेतकरी मोठय़ा संकटात सापडले आहेत.
सकाळपासून रात्रीपर्यंतचे दाट धुके, सूर्यप्रकाशाचा अभाव आणि वाढती उष्णता या सर्वांमुळे स्ट्रॉबेरीच्या रोपांवर किडीचा प्रादुर्भाव झपाटय़ाने वाढू लागला आहे. लाल कोळी, चुरडा-मावा तसेच फंगल इन्फेक्शनचे प्रमाण वाढत आहेत. फुलगळी वाढणे, फळधारणेतील घट, कोवळ्या फळांवर डाग दिसणे, पानांमध्ये करपा आणि करकरी ही लक्षणे अनेक शेतकऱयांनी दाखवून दिली आहे. थंडीच्या अभावामुळे स्ट्रॉबेरीची वाढ रोखली जात असून, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता कृषी तज्ञांनी वर्तविली आहे.
यामुळे वाई तालुक्यातील अनवडी, ओझर्डे, खानापूर, किकली, वाई, भुईंज परिसरातील शेतकरी हवामानामुळे हवालदिल झाले आहेत. जावळीतील मेढा, केळघर सायघर, दिवदिव, तापोळा भागांतही पिकावर हा परिणाम तीव्र असल्याचे चित्र आहे. महाबळेश्वर, पाचगणी, भोसे, खिंगर, भिलार, कासवंड या मुख्य स्ट्रॉबेरी क्षेत्रांमध्ये देखील परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. वातावरणातील ही अस्थिरता आणखी काही दिवस टिकली, तर उत्पादन 25 ते 30 टक्क्यांनी घटण्याची शक्यता शेतकऱयांनी वर्तविली आहे.
पुढील काळात ड्रीपद्वारे समतोल सिंचन, कीड नियंत्रणासाठी तातडीने सेंद्रिय व रासायनिक फवारणी, तसेच आर्द्रता कमी करण्यासाठी प्लॅस्टिक मल्चिंगचा वापर करण्याचा सल्ला कृषीतज्ञ देत आहेत. थंडी परत येईपर्यंत पिकाच्या संरक्षणासाठी विशेष दक्षता घेणे अत्यावश्यक असल्याचे ते सांगतात. आगामी काही दिवसांत वातावरण स्थिर झाल्यास शेतकऱयांना दिलासा मिळू शकतो, असे चित्र सध्यातरी दिसत आहे.




























































