
“नरेंद्र मोदी हे गेली १२ वर्ष देशाच्या पंतप्रधानपदी आहेत. जवळजवळ तेवढीच वर्षे पंडित नेहरूंनी तुरुंगात घालवली”, असं म्हणत काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याला आठवडल्याला सुरुवात झाली असून आज ‘वंदे मातरम्’वर चर्चा होत आहे. याचवेळी बोलताना प्रियंका गांधी यांनी ही टीका केली आहे.
लोकसभेत बोलताना प्रियांका गांधी म्हणाल्या की, “पंडित नेहरूंनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी १२ वर्षे तुरुंगात घालवली. त्यानंतर त्यांनी १७ वर्षे पंतप्रधान म्हणून काम केलं. पंडित नेहरूंचा अपमान करण्यासाठी शक्य तितक्या गोष्टी गोळा करा, नंतर सभापतींच्या परवानगीनं दीर्घ चर्चा करा. पण जनतेनं आम्हाला येथे कामासाठी पाठवलं आहे, त्याबद्दल बोला. बेरोजगारी, गरिबी, प्रदूषण… या गोष्टींवर चर्चा का केली जात नाही?”
‘वंदे मातरम्’वरील चर्चेवर बोलताना प्रियांका गांधी म्हणाल्या की, “जेव्हा आपण वंदे मातरम म्हणतो तेव्हा तीच भावना जागृत होतं, जी आपल्याला स्वातंत्र्यलढ्याची, त्याच्या धैर्याची, ताकदीची आणि नैतिकतेची आठवण करून देते. ज्यापुढे ब्रिटिश साम्राज्याने नतमस्तक झालं होतं.”
प्रियंका गांधी म्हणाल्या, “हे गीत गेल्या १५० वर्षांपासून देशाच्या आत्म्याचा भाग आहे. देशातील लोकांच्या मनात घर करून आहे. गेल्या ७५ वर्षांपासून हे देशात आहे. आज याच्यावर चर्चा का होत आहे? याचा हेतू काय आहे? जनतेचा विश्वास, त्यांच्याप्रति आपली जबाबदारी आपण कशी पार पाडत आहोत?” त्या पुढे म्हणाल्या की, बंगाल निवडणुकीमुळेच ‘वंदे मातरम्’ वर चर्चा होत आहे.


























































