
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात आज ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीतावर विशेष चर्चा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चर्चेला सुरुवात केली. चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींनी वंदे मातरम् या गीताचे जनक आणि प्रसिद्ध बंगाली कवी बंकिमचंद्र चॅटर्जी यांचा उल्लेख ‘बंकिम दा’ असा केला. यावर तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी लगेचच आक्षेप घेतला. त्यांनी पंतप्रधान मोदी संसदेत बोलत असतानाच थांबवलं आणि म्हटलं की, “तुम्ही बंकिम दा म्हणत आहात, बंकिम बाबू, असं म्हणाला.”
सौगत रॉय यांनी ‘दा’ चा अर्थ स्पष्ट केला, त्यांनी सांगितलं की, मोठ्या भावाला बंगाली भाषेत ‘दा’ असं म्हणतात. म्हणूनच तुम्ही त्यांना बंकिम बाबू म्हणावं. यानंतर पंतप्रधान मोदींनी लगेचच तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांची विनंती मान्य केली आणि म्हणाले, “मी बंकिम बाबू म्हणेन. धन्यवाद, मी तुमच्या भावनांचा आदर करतो.”




























































