ज्यांनी स्वतःच्या कार्यालयावर दशकानुदशके तिरंगा फडकावला नाही, तेच आज वंदे मातरमच्या गौरवावर भाष्य करत आहेत – अरविंद सावंत

ज्यांनी स्वतःच्या कार्यालयावर दशकानुदशके तिरंगा फडकावला नाही, राष्ट्रगीत-राष्ट्रगान गायले नाही तेच आज वंदे मातरमच्या गौरवावर भाष्य करत आहेत, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी केली. तसेच आज आपण वंदे मातरमच्या 125 वर्षांचा उत्सव करत असू तर थोडे आत्मपरीक्षण आवश्यक आहे असेही अरविंद सावंत म्हणाले.

संसदेत आज वंदे मातरम वर चर्चा झाली. तेव्हा अरविंद सावंत म्हणाले की, वंदे मातरम विषयी बोलणे म्हणजे स्वाभिमानाचा विषय आहे. अनेक सदस्यांनी याआधी महत्त्वपूर्ण मते मांडली आहेत. मी एका ऐतिहासिक घटनेपासून सुरुवात करू इच्छितो. इ.स. 1873 साली बंकिमचंद्र चटर्जी यांचा एका इंग्रज अधिकाऱ्याने अपमान केला. त्यांना मार्ग बदलायला लावला, त्यांच्या स्वतःच्या देशात त्यांना परकेपणाची वागणूक मिळाली. त्या घटनेने त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. आणि त्यातूनच मातृभूमीच्या अपमानाची वेदना त्यांच्या मनात पेटली.

एक कथा सांगितली जाते त्यांच्या मुलीने विचारले की, “वंदे मातरम तुम्ही कसे लिहिले?” तेव्हा त्यांनी सांगितले: “भारत माता माझ्या स्वप्नात आली. मी नाही तिने माझ्या हातून हे शब्द लिहवून घेतले.” त्या काळात बंगाल म्हणजे आजचा बंगाल नव्हे त्यात ओडिशा, बिहार आणि आजचा बांग्लादेशही होता. म्हणूनच वंदे मातरमच्या पुढील कडव्यांत देवी दुर्गेचे वर्णन आले आहे, कारण मातृभूमीचे स्वरूप त्यांनी ‘माता’ म्हणून पाहिले.

यानंतर बंगालचे विभाजन झाले आणि “भंग भंग बंगाल” असे नारे घुमू लागले. त्याच काळात वंदे मातरम हा संघर्षाचा घोष बनला. त्यावेळी त्यांच्या मित्रांनी म्हटले की गीत अर्धे बंगाली आणि अर्धे संस्कृत असल्याने प्रभाव पडत नाही पण वास्तव उलटे झाले. हा घोष संपूर्ण भारतभर पसरला. आपण स्वातंत्र्यानंतर जन्मलो. तरी बालपणी शाळांमध्ये 15 ऑगस्ट, 26 जानेवारीला वंदे मातरम, राष्ट्रगीत आणि भारत माता की जय म्हणत होतो. त्या काळी प्रभातफेरी होत, हिंदू-मुसलमान सर्वजण एकत्र राष्ट्रध्वज घेऊन निघत असत. आज आठवते “झेंडा उंचा रहे हमारा…” हेही गात असू. आज विडंबना अशी आहे की, ज्यांनी स्वतःच्या कार्यालयावर दशकानुदशके तिरंगा फडकावला नाही, राष्ट्रगीत-राष्ट्रगान गायले नाही तेच आज वंदे मातरमच्या गौरवावर भाष्य करत आहेत. मी स्पष्ट सांगतो डॉक्टर हेडगेवार आणि गुरु गोलवलकर यांच्या कोणत्याही लिखाणात वंदे मातरमचा उल्लेख आढळत नाही. असेल तर दाखवा.

1907 मध्ये मॅडम भीकाजी कामांनी परदेशात भारतीय झेंडा फडकवताना “वंदे मातरम” लिहून तो ध्वज सादर केला. काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनात वंदे मातरमचाच उच्चार होत असे. 20 मे 1906 रोजी बांग्लादेशातील बरिसाल येथे 10 हजार हिंदू आणि मुसलमानांनी वंदे मातरमचे झेंडे घेऊन मोर्चा काढला. त्या काळी वंदे मातरम म्हटल्याबद्दल शाळांमधील विद्यार्थ्यांवर दंड होत होता तेवढे त्याचे सामर्थ्य होते.

आजही राज्यसभेत “Thank you”, “जय हिंद” आणि “वंदे मातरम” म्हणण्यावर नियमांचा पगडा आहे पण अद्याप तो नियम रद्द झालेला नाही. जर आज आपण वंदे मातरमच्या 125 वर्षांचा उत्सव करत असू तर थोडे आत्मपरीक्षण आवश्यक आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यात 14 वर्षांचा शिरीष कुमार तिरंगा हातात घेऊन वंदे मातरम म्हणत होता आणि त्याला ब्रिटिशांनी गोळ्या घालून ठार केले. 1942 च्या भारत छोडो आंदोलनात अरुणा आसफ अली यांनी हिरवळ मैदानात तिरंगा फडकावून स्वातंत्र्याचा नारा दिला.

आज आपण “आत्मनिर्भर भारत” म्हणतो ते उत्तम आहे. पण खरोखर कोणती संस्था स्वतंत्र, निष्पक्ष आणि स्वाभिमानी आहे? न्यायपालिका? CBI? आयकर विभाग? ED? निवडणूक आयोग? एकही संस्था स्वतंत्र नाही. वंदे मातरम म्हणायचे असेल तर न्याय, समानता आणि संविधानाला जगवण्याची गरज आहे. कारण आज लोक न्याय मागत आहेत. बेलगाव ते विदर्भ प्रश्न असोत ते 60 वर्षे प्रलंबित आहेत.

लोकशाही वाचवायची असेल तर पुन्हा एकदा “वंदे मातरम” उर्जेने म्हणावे लागेल. संविधान आणि लोकशाहीवर घाव पडत असताना फक्त घोषणा उपयोगाच्या नाहीत कृती आवश्यक आहे. शेवटी मी मराठी कवी ग.दि. माडगूळकरांची कविता उद्धृत करू इच्छितो कारण तीच या संघर्षाचा सार आहे: “वंदे मातरम् हा केवळ गाणं नाही तो स्वातंत्र्याचा मंत्र आहे. त्यासाठी यज्ञ झाला, लाखो वीरांनी आहुती दिली आणि त्या मंत्राने राष्ट्र जागे झाले.” असेही अरविंद सावंत यांनी यावेळी नमूद केले.