शिवसैनिकांनी वाचवले रेल्वे प्रवाशाचे प्राण, घाटकोपर रेल्वे स्थानकातील घटना

घाटकोपर रेल्वे स्थानकात एका प्रवाशाच्या छातीत अचानक दुखू लागले. तिथे उभ्या असलेल्या शिवसैनिकांनी प्रसंगावधान दाखवत या प्रवाशाला तत्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल केले. वेळीच उपचार मिळाल्याने या प्रवाशाचे प्राण वाचले आहेत. शिवसैनिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दाखवलेल्या समयसूचकतेचे नागरिकांनी कौतुक केले.

घाटकोपर रेल्वे स्थानकात रेल्वेची वाट बघत असताना ज्या डब्यात शिवसैनिक प्रकाश वाणी, चंद्रकांत हळदनकर, सचिन भांगे चढणार त्याच डब्यातून अत्यवस्थ अवस्थेत मुंब्रा येथे राहणारे खजरुल नुरुल इस्लाम हे बाहेर पडले. त्यांना अचानक छातीत दुखत असल्याने इतर प्रवाशांनी त्यांच्या डोक्यावर पाणी टाकले व प्राथमिक उपचार देण्याचे प्रयत्न केले. याचवेळी परिस्थितीचे गांभीर्य पाहून प्रकाश वाणी यांनी रेल्वे पोलिसांना सांगून तत्काळ रुग्णवाहिका बोलावत त्यांना घाटकोपर येथील मुंबई मनपाच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी खजरुल नुरुल इस्लाम या रेल्वे प्रवाशावर त्वरित उपचार करत त्याला जीवदान दिले.