
पाकिस्तानी लष्कराचे प्रवत्ते अहमद शरीफ चौधरी यांचा एक कारनामा चव्हाट्यावर आला आहे. चौधरी यांनी एका महिला पत्रकाराला ‘ऑन कॅमेरा’ डोळा मारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकारानंतर चौधरी यांच्यासह पाकिस्तानी सरकार व लष्करावर टीकेची झोड उठली आहे.
सध्या तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या विषयीच्या प्रश्नोत्तराच्या वेळी हा प्रकार घडला. पाकिस्तान सरकारने इम्रान यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. पत्रकार अब्सा कोमल यांनी यावरून चौधरी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.
‘इम्रान खान हे देशाच्या सुरक्षेला धोका आहेत, राष्ट्रविरोधी आहेत आणि दिल्लीचे हस्तक म्हणून काम करतात, असे सरकारचे म्हणणे आहे. पण या आरोपात नवीन काय आहे,’ अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर उत्तर देताना, ‘यात आणखी एक आरोप जोडून घ्या. इम्रान खान हे मानसिक रुग्ण आहेत,’ असे चौधरी म्हणाले. हे सांगताना हसत हसत त्यांनी अब्सा कोमल यांच्याकडे पाहून डोळा मारला.
नेटकरी संतापले!
हा व्हिडीओ पाहून नेटकऱयांनी पाकिस्तानला लक्ष्य केले. ‘लष्करी गणवेशातील माणूस असा जाहीरपणे कोणाला डोळा कसा मारू शकतो?… पाकिस्तानातील लोकशाही संपली असून पंतप्रधान हा बाहुला आहे… कदाचित याला आई-बहीण नसावी… या लोकांनी संपूर्ण देशाची हिरामंडी बनवून टाकली आहे… अशा संतप्त प्रतिक्रियांचा पाऊस सोशल मीडियात पडला आहे.



























































