
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षनेता नेमला गेलेला नाही. विरोधी पक्षनेत्यांविनाच सभागृहाचे कामकाज सुरू आहे. यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषद सभापती राम शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. केवळ विरोधाला विरोध म्हणून नाही, तर लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेता असायलाच हवा, अशी विनंती आपण दोघांनाही केली असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, विरोधी पक्षनेतेपदाबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष व विधान परिषदेच्या सभापतींकडे असतो. नियमानुसार आम्ही दोघांकडेही जाऊन विरोधी पक्षनेता नेमण्याची विनंती केली. आमच्या मनातही तसा विचार सुरू आहे असे सांगत लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दोघांनीही दिले, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. लवकरात लवकर या शब्दावर जोर देत, असेच आश्वासन मागच्या अधिवेशनावेळीही देण्यात आले होते, मात्र तो दिवस उजाडलाच नाही, असा चिमटाही उद्धव ठाकरे यांनी काढला.
उपमुख्यमंत्रीपदासाठीही नियमाची मोजपट्टी वापरा
महाविकास आघाडी सरकारमध्येही उपमुख्यमंत्रीपद होते. विरोधी पक्षनेतादेखील होता. आम्ही दोन्ही पदांचे स्वागत केले होते. नियम हे सगळीकडे सारखेच असायला हवेत. विरोधी पक्षनेत्याला सरकार नियमाची मोजपट्टी लावत असेल तर उपमुख्यमंत्रीपदालाही नियमाची मोजपट्टी वापरा, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
नियमांची आडकाठी कराल तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा
संख्याबळाचे कारण देत, नियमांची आडकाठी करून सरकार विरोधी पक्षनेता नेमत नसेल तर असंवैधानिक असलेल्या उपमुख्यमंत्री पदाला विरोध करू, असेही आपण विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापतींना सांगितल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. काहीजण आपल्या नावापुढे उपमुख्यमंत्री हे बिरूद लावून मिरवत आहेत. नको त्या लोकांच्या नावापुढे ते बिरूद लावले जात आहे. ते पदही ताबडतोब रद्द करायला हवे, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली.
दिल्लीत केजरीवालांनी 3 आमदार असताना विरोधी पक्षनेतेपद दिले होते
दिल्लीत 70 पैकी 67 जागा निवडून आल्यानंतर अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी भाजपच्या फक्त तीन जागा निवडून आल्या होत्या. त्यानंतरही केजरीवाल यांनी भाजपला विरोधी पक्षनेते पद दिले होते. त्याची माहिती पत्रकारांनी यावेळी देताच, राजधानी दिल्लीत तसे घडत असेल तर ते महाराष्ट्रात का होऊ शकत नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.































































