मेस्सीला बघता आले नाही म्हणून फुटबॉलप्रेमींची हुल्लडबाजी, कोलकात्यात फॅन्सकडून स्टेडियमची मोडतोड; खुर्च्या भिरकावल्या, बाटल्या फेकल्या…

जगप्रसिद्ध फुटबॉल स्टार लियोनल मेस्सी याच्या कोलकाता दौऱ्याला ढिसाळ नियोजन व राडय़ाचे गालबोट लागले. मेस्सीला प्रत्यक्ष बघता आले नाही म्हणून नाराज झालेल्या फुटबॉलप्रेमींनी तुफान हुल्लडबाजी करत सॉल्ट लेक स्टेडियममध्ये मोडतोड केली, खुर्च्या भिरकावल्या आणि बाटल्या फेकत तीव्र संताप व्यक्त केला.

मेस्सी सध्या हिंदुस्थान दौऱ्यावर आहे. तो कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि दिल्लीला भेट देणार आहे. या दौऱ्याची सुरुवात कोलकाता भेटीने झाली. कोलकात्यातील सॉल्ट लेक स्टेडियमवर त्याच्या 70 फुटी पुतळय़ाच्या अनावरणाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाची प्रचंड हवा करण्यात आली होती. कार्यक्रमाची तिकिटे 4 हजार ते 12 हजारांना विकली गेली. काहींनी ती 20 हजार रुपयांत
ब्लॅकने खरेदी केली होती. मेस्सीची एक झलक पाहता येईल या आशेने फुटबॉलप्रेमी सकाळपासूनच स्टेडियमवर आले होते. तब्बल 50 हजार लोकांची खचाखच गर्दी झाली.

नेमकं घडलं काय?

सकाळी साडेअकराच्या सुमारास मेस्सी कार्यक्रमस्थळी पोहोचला. काही मिनिटांतच त्याला राजकारणी, व्हीआयपी व पोलीस अधिकाऱयांचा गराडा पडला. गर्दीमुळे मेस्सी गोंधळला.  शेवटी मेस्सीने अवघ्या 22 मिनिटांतच तिथून काढता पाय घेतला. या गोंधळा प्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मेस्सीसह फुटबॉलप्रेमींचीही माफी मागितली.