दिल्ली विषारी हवेच्या विळख्यात; पंतप्रधानांसह मेस्सीच्या विमानांना फटका

दिल्लीतील हवा अतिशय विषारी झाली असून अनेक भागांत हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) हा 500 पर्यंत पोहोचला होता. कडाक्याची थंडी, स्मॉग आणि प्रदूषण अशा तिहेरी माऱयामुळे दिल्लीतील दृश्यमानता अतिशय कमी झाली. याचा फटका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह फुटबॉलचा स्टार लियोनल मेस्सी यांनाही बसला. जॉर्डनच्या दौऱयावर निघालेल्या पंतप्रधान मोदी यांचे विमान कमी दृश्यमानतेमुळे तासभर दिल्लीत विमानतळावर अडकले होते. तर मेस्सीच्या विमानाचे उशिरा लँडिंग झाले.

ग्रेप-4 लागू केल्यानंतरही वजीरपूर, रोहिणी इत्यादी भागात एक्यूआय 500च्या पातळीवर पोहोचला. ही अतिशय धोकादायक पातळी असून दिल्लीची अवस्था एखाद्या गॅस चेंबरसारखी झाली आहे. दाट धुक्यामुळे दृश्यमानता 50 मीटरपर्यंत कमी झाली असून 60 उड्डाणे रद्द करण्यात आली. तसेच अनेक उड्डाणांना विलंब होत आहे. रेल्वेदेखील दाट धुक्यामुळे उशिरा धावत आहेत.

पाचवीपर्यंतच्या शाळा ऑनलाइन घेण्याचे आदेश

व्ााढत्या प्रदूषणामुळे दिल्लीत नर्सरी ते इयत्ता पाचवीपर्यंतच्या सर्व शाळांचे वर्ग ऑनलाइन घेण्याचे आदेश दिल्ली सरकारने दिले आहेत.